23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली

मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली

हिंदी सक्तीचा निर्णय माझा नाही, भाजप ही अफवांची फॅक्टरी : उद्धव ठाकरे ५ तारखेला जल्लोष सभा किंवा मोर्चा

मुंबई : प्रतिनिधी
मराठीच्या मुद्यावर मराठी माणूस एकत्र येत होता. ५ तारखेला त्याचे प्रतिबिंब दिसणार होते. पण मराठी माणसाची एकजूट होउ नये अशीच या सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच आजच हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आपल्या काळात निर्णय झाल्याचा दावा पूर्णत: खोटा आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

माशेलकर समितीचा अहवाल मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर कधीच आला नाही, मी कधी तो उघडूनही बघितला नाही. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे असे टिकास्त्र देखील उद्धव ठाकरे यांनी सोडले. मी जर तो जीआर काढला होता तर हे तीन वर्षे काय झोपा काढत होते का ?असा सवालही त्यांनी केला. सरकारने हिंदीचे जीआर रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर मातोश्री येथे पत्रकारपरिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. मराठी माणूस एकवटल्यावर काय होते हे दिसून आले.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी देखील असेच झाले होते असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणूस एकवटू नये यासाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण एकत्र येण्यासाठी संकट येण्याची वाट मराठी माणसाने का बघायची. आम्ही एकवटतोय हे पाहूनच हे संकट मागे गेले. त्यामुळे आता ५ तारखेला आम्ही सगळे एकत्र येणार आहोत. तो जल्लोषाचा मोर्चा असेल. आता मोर्चा काढायचा की सभा घ्यायची हे आम्ही सगळे मिळून ठरवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप ही अफवांची फॅक्टरी
मध्यंतरी हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट आला होता. तशीच भाजप ही अफवांची फॅक्टरी बनली आहे. अफवांची फॅक्टरी हा चित्रपट काढा व त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चित्र लावा असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा शैक्षणिक धोरण आले होते तेव्हा त्यावर विचार करण्याासाठी माशेलकर समिती नेमण्यात आली होती. उच्चशिक्षणासंदर्भात ती समिती होती. तेव्हा उदय सामंत उच्चशिक्षण मंत्री होते. माशेलकर समितीचा अहवाल मी फक्त स्वीकारला. तो मी कधी उघडूनही पाहिला नाही. त्यावर अंमलबजावणी करायची किंवा नाही यावर विचार करण्यासाठी मी एक अभ्यासगट नेमला. पण त्यानंतर या लोकांनी सरकार पाडले. त्यावर काहीच निर्णय झाला नाही. आणि समजा मी जर जीआर काढला असेल तर हे तीन वर्षे काय झोपा काढत होते का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. आता जरी नव्याने समिती नेमली असेल तरी आम्ही हिंदी सक्ती कधीच होऊ देणार नाही.

५ जुलैला मोर्चा नाही तर विजयी सभा
हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर खा.संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याचे जाहीर केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी आता ५ जुलैला विजयी मोर्चा किंवा विजयी सभा घेतली जाईल असे सांगितले. मराठी अमराठी वाद लावण्याचा सरकारचा डाव होता. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. त्यामुळे या विजयाचा जल्लोष ५ जुलैला केला जाईल. हा निर्णय रद्द झाल्यामुळे आपण विजयी सभा घेऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR