21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन

रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पवार यांनी केली. शेतक-यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा १० हजार शेतक-यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे.

रोहित पवार हे बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी, त्यांनी शेतक-यांना भेटून चारा, जनावरांच्या आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर रोहित पवार यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची भेट घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत याबाबत निवेदन देखील दिले. तसेच, दिवाळीच्या आधी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दुष्काळी सवलती लागू कराव्यात
याबाबत ट्वीट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘‘मराठवाड्यातील ७६ पैकी ६० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असूनही, केवळ १४ तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केलाय. शिवाय मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे जाहीर केलेले हेक्टरी १३ हजार रुपयांचे अनुदानही अद्याप शेतक-यांपर्यंत पोहोचलेले नाही. राज्यात इतरत्रही अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान व पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. या मागणीचे निवेदन मराठवाडा विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे दिले असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR