नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात मोठी घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एनआयआयमध्ये म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्नात मंदी आल्याचे दिसून येत आहे. यामुळे बँकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत आरबीआयने उपाययोजना केल्या असून, याचे भविष्यात परिणाम दिसू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मार्च २०२५ चा तिमाही काळ बँकांसाठी फारसा चांगला नव्हता. यावेळी बँकांचा एकूण नफा फक्त एका अंकाने वाढला, जो गेल्या ४ वर्षांत म्हणजेच १७ तिमाहीत पहिल्यांदाच दिसून आला. खासगी क्षेत्रातील बँकांची कमकुवत कामगिरी आणि देशातील सर्वांत मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात झालेली घट ही या मंदीचे प्रमुख कारण ठरली. निव्वळ व्याज उत्पन्नातही फक्त एका अंकाने वाढ झाली तर मार्जिनवर सतत दबाव होता.
जर आपण २९ बँकांचा नमुना पाहिला तर एकूण निव्वळ नफ्यात ४.९ टक्के वाढ झाली आहे. जी ९३८२८.३ कोटी रुपये होती. परंतु यावेळी देशातील सर्वांत मोठी बँक एसबीआय नफ्याच्या बाबतीत मागे पडली. एसबीआयचा निव्वळ नफा ९.९ टक्क्यांनी घसरून १८६४२.६ कोटी रुपये झाला. या नमुन्यात एसबीआयचा वाटा २० टक्के होता. जो एसबीआयच्या कामगिरीचा एकूण आकडेवारीवर किती परिणाम होतो, हे दर्शवितो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितपणे १३ टक्के नफ्यात वाढ नोंदवली आहे. जी ४८४०३ कोटी रुपये होती. परंतु ही वाढ गेल्या ११ तिमाहींमधील सर्वांत कमी होती.
यावेळी बँकांच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही मंदी दिसून आली. या तिमाहीत एनआयआय फक्त ३.७ टक्के वाढून २.१ लाख कोटी रुपये झाला, जी गेल्या १४ तिमाहींमधील सर्वात कमी वाढ होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एनआयआयमध्ये फक्त २.४ टक्के वाढ नोंदवली गेली तर खासगी क्षेत्रातील बँकांची ५.३ टक्के वाढ दर्शविली.दरम्यान, निव्वळ व्याज मार्जिन अनेक तिमाहींपासून दबावाखाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेपो दरात घट होऊनही बँकांनी ठेवींचे दर कमी करण्यास उशीर केला. मार्च २०२५ च्या तिमाहीत नमुना असलेल्या २९ पैकी १९ बँकांची वार्षिक आधारावर एनआयएममध्ये घट नोंदवली. मार्जिनमधील घट थेट नफ्यावर परिणाम करते.
दरम्यान, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही पावले उचलली आहेत. सप्टेंबर २०२४ पासून आरबीआयने बँकिंग प्रणालीमध्ये अतिरिक्त तरलता आणण्यास सुरुवात केली. तसेच व्याजदरातही कपात झाली. याचा पुढील काही तिमाहीत सकारात्मक परिणाम दिसेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
खासगी बँकांचा नफा २.५ टक्क्यांनी घसरला
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगली कामगिरी केली असेल. परंतु खासगी बँकांची कामगिरी आणखी वाईट होती. खासगी क्षेत्रातील बँकांचा एकूण नफा २.५ टक्क्याने घसरून ४५४२४.९ कोटी रुपये झाला. गेल्या १३ तिमाहीत खासगी बँकांच्या नफ्यात वर्षानुवर्षे घट झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
खासगी बँकांंच्या वाट्यावर परिणाम
या कमकुवत कामगिरीचा खासगी बँकांच्या वाट्यावरही परिणाम झाला. नमुन्याच्या एकूण नफ्यात त्यांचा वाटा ५२.१ टक्क्यांवरुन ४८.४ टक्क्यांपर्यंत घसरला. जो गेल्या ८ तिमाहींमधील सर्वांत कमी आहे.रिझर्व्ह बँकेच्या मदतीने बँकांच्या नफ्याची गती सुधारु शकते