मुंंबई : प्रतिनिधी
यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रबी हंगामातील पिके कशी जगवायची, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकला आहे. गहू आणि हरभ-याच्या पेरणीचा हंगाम जवळ येत असताना पेरणी बाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
दरम्यान, यंदा राज्यात पावसाचे अत्याल्प प्रमाण असल्याने नदी, नाले, धरणे व भुजलसाठी कोरडीच राहिली आहेत. पावसाअभावी खरीप पेरणीतर गेली पण जमिनीत ओलावा नसल्याने रबीची पेरणी करावी की नाही या विचाराने शेतकरी संभ्रमात आहेत.
यंदा मर्यादित जलसाठ्यामुळे सिंचनाचे नियोजन अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवल्यानंतर शेतीसाठी किती पाणी उपलब्ध होईल, किती वितरिका सुरू होतील आणि किती क्षेत्राला त्याचा लाभमिळेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
खरीप हंगामातील नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना आता रबीच्या पेरणीवर खर्च करण्यापूर्वी पाण्याची खात्री हवी आहे. पेरणी, बियाणे आणि खतांवर खर्च केल्यानंतर सिंचनासाठी पाणी मिळाले नाही, तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती शेतकरी व्यक्त केली.
पिण्याचे पाणी आणि सिंचन साधण्याचे आव्हान
एकीकडे शहराची पिण्याच्या पाण्याची गरज, तर दुसरीकडे रबी पिकांसाठी सिंचनाची मागणी, अशा दुहेरी आव्हानाला प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतक-यांच्या आशा आता रबी पिकांवर आहेत. मात्र, सिंचनाच्या पाण्याची अनिश्चितता कायम राहिल्यास पेरणीचे क्षेत्र आणि संभाव्य उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
















