मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी सरसावले असून सुमारे साडे तीन लाख कर्मचा-यांनी एक दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६० कोटी १० लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे जमा होणार आहे.
राज्यात यावर्षी पावसाअभावी भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कापूस व तुर पिकाची वाढ खुंटल्यामुळे आता हे पिके देखील हातचे गेल्यातच जमा आहे. तर पाऊस नसल्याने जमीनीत ओल नाही त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिका-यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केल्यानंतर दुष्काळी परिस्थिती अधोरेखीत झाली आहे. त्यानंतर शासनाने राज्यातील सुमारे ३०५ तालुक्यांमधून दुष्काळ जाहिर केला आहे. त्यानंतर शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना ५००० रुपये अग्रीम मदत जाहिर केली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघानेही दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे ३.५०लाख चतुर्थश्रेणी कर्मचारी त्यांचे एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे जमा करणार आहेत.
या संदर्भात संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस बाबाराम कदम यांनी शासनाकडे पत्र दिले आहे. यावेळी संघटनेचे मनोहर दिवेकर, बाळाराम सवर्डेकर, शरद वनवे, रमेश लव्हांडे, संतोष गायकवाड, अमोल गायकर यांची उपस्थिती होती. कर्मचा-यांच्या ऑक्टोबर महिन्यातील वेतनातून एक दिवासंचे वेतन कपात करण्याबाबत पत्रात नमुद केले आहे. त्यानुसार सर्व कर्मचा-यांचे एक दिवासांचे सुमारे ५० कोटी १० लाख रुपयांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे जमा होणार आहे.
















