नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बुधवारी सकाळी मोठा निर्णय घेतला. राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, मंडी हाऊस, आयटीओ आणि खान मार्केट या प्रमुख स्थानकांसह एकूण १६ मेट्रो स्थानके पुढील आदेश येईपर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी दिल्लीत हजारो आंदोलक जमा झाले असून सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार १६ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, या मेट्रो स्थानकांची एन्ट्री आणि एक्झिट गेट्स बंद असले तरी राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट या महत्त्वाच्या जंक्शनवर स्थानकांदरम्यान गाड्या बदलण्याची सुविधा सुरूच राहेल, अशी माहिती डीएमआरसीने दिली. मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर निघणा-या आणि प्रवास करणा-या सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतरच ही स्थानके पुन्हा उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
















