नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनात मंगळवारी अनोखे दृश्य पाहायला मिळाले. या आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची अन्नाविना गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण देशातून नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. देशभरातील लोक स्विगी आणि झोमॅटो यांसारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप्सच्या माध्यमातून आंदोलक विद्यार्थ्यांसाठी थेट जंतर-मंतरवर जेवण आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत आहेत.
कधी पाऊस आणि कधी ऊन अशा वातावरणाचा सामना करत रस्त्यावर बसलेल्या विद्यार्थ्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी, या उद्देशाने लोकांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून मिळणा-या या थेट पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पाठवण्यात आलेल्या ऑर्डर्स दिल्लीतूनच नव्हे, तर देशातील मुंबई, हैदराबाद, पंजाब अशा अनेक वेगवेगळ्या शहरांमधून नागरिकांनी ऑनलाईन नोंदवल्या होत्या. हे अन्नपदार्थ जंतरमंतरवर उपस्थित असलेल्या कोणत्याही भुकेल्या विद्यार्थ्याला किंवा आंदोलकाला देण्यात यावेत, अशा खास सूचना डिलिव्हरी बॉईजना देण्यात आल्या होत्या.
अज्ञात नागरिकांच्या शेकडो ऑडर्स
दिल्लीतील कनॉट प्लेस आणि परिसरातील अनेक रेस्टॉरंट्समध्ये अशा ऑर्डर्सचा सतत ओघ सुरू होता. आकाश नावाच्या एका डिलिव्हरी बॉयने दिलेल्या माहितीनुसार, त्याने दुपारी चार वाजेपर्यंत एकट्यानेच जंतर मंतरवर किमान १० ऑर्डर्स पोहोचवल्या होत्या. त्याच्यासोबत अशा प्रकारे अन्न पोहोचवणारे आणखी चार डिलिव्हरी बॉय तिथे कार्यरत होते. अंदाजानुसार, देशभरातील अज्ञात नागरिकांनी जंतर मंतरवर पिझ्झा, बर्गर, समोसे, जेवणाची थाळी आणि इतर खाद्यपदार्थांच्या सुमारे ५०० ऑर्डर्स दिल्या असाव्यात.
डिलिव्हरी बॉय उत्साहात
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडीओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुसळधार पावसात एक डिलिव्हरी बॉय आंदोलकांना अन्नाची पाकिटे देताना दिसत आहे. याशिवाय पार्लमेंट स्ट्रीटवर अनेक तरुण डिलिव्हरी बॉईजकडून अन्नाची पाकिटे घेऊन आंदोलकांमध्ये वाटताना दिसले, तर जनपथ स्ट्रीटवरही डिलिव्हरी बॉईजची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आंदोलनस्थळाच्या आत, बाहेर आणि आसपासच्या रस्त्यांवर अनेक नागरिक आपापल्या क्षमतेनुसार पाणी, शीतपेये, आईस्क्रीम, बिस्किटे, फळे, बिर्याणी, ज्यूस आणि टॉफींचे वाटप करत होते. काही जण स्टॉल्स लावून तर काही फिरून या वस्तूंचे वाटप करत होते. मी नोकरी करते आणि आपल्या रोजच्या कमाईतील अर्धा हिस्सा आंदोलकांसाठी पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यात खर्च करत आहे असे पाणी वाटणा-या एका तरुणीने सांगितले.
















