नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामुळे आता शासकीय अधिकारी अडचणीत आला आहे. मुंबईतील उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिका-याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अभिजीत भांडे पाटील असे या उपजिल्हाधिका-याचे नाव आहे. अभिजीत भांडे यांची बदली थेट मंत्रालयामध्ये करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये आता राजकीय नेत्यांनंतर शासकीय अधिकारी देखील अडचणीत आले आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत आला आहे. या प्रकरणात पहिल्या शासकीय अधिका-यावर कारवाई करण्यात आली आहे. अभिजीत भांडे पाटील यांची मंत्रालयातील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. अभिजीत भांडे यांना अशोक खरातसोबत पत्नीच्या नावे गुंतवणूक करणे भोवले. खरात प्रकरणात आता अनेक महसूल अधिकारी देखील रडारवर आहेत.
मुंबईमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजीत भांडे पाटील यांचे भोंदूबाबा अशोक खरातसोबत संबंध असल्याचे उघड झाले. अभिजीत भांडे यांनी अशोक खरातच्या मुलगी आणि बायकोच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
अशोक खरात प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची आणि अटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

