मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर ७० कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करणा-या मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कथनी अन् करणीत फरक आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला ५ महिला नेत्या हजर होत्या बोलले कोण? केवळ देवेंद्र फडणवीसच. मंचावर बसलेल्या एकाही महिलेला बोलण्याची संधी नाही, केवळ दिखाऊ उपस्थिती. अशी टीका काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (२० एप्रिल) महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रृणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत जोरदार पलटवार केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपची कथनी आणि करनी. भाजपचा महिलांबाबत कळवळा किती दिखाऊ स्वरूपाचा आहे हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले. मंचावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री, विधान परिषदेच्या महिला उपसभापती, राज्यसभेच्या महिला खासदार, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उपस्थित असताना बोलले कोण? केवळ देवेंद्र फडणवीस… मंचावर बसलेल्या एकाही महिलेला बोलण्याची संधी दिली नाही.
मोदींचे भाषण आचारसंहिता भंग करणारे
रविवारी महिला आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आचारसंहितेचा भंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी ५० हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
सत्तेसाठी भाजपचा कुटिल डाव
काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले.

