Homeअंतरराष्ट्रीयगॅस, तेलानंतर आता डेटा वॉर?

गॅस, तेलानंतर आता डेटा वॉर?

इराणचा इशारा, इंटरनेट केबल निशाण्यावर, सेवा ठप्प होण्याचा धोका, जगाचा जीव टांगणीला
तेहरान : वृत्तसंस्था
मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. खनिज तेलाचे दर आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. यानंतर आता जगावर आणखी एक संकट कोसळण्याची चिन्हे आहेत. समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबल्स पुढील लक्ष्य असू शकतात, असा इशारा इराणशी संबंधित माध्यमांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. अमेरिकेने इराणसोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी सुरू ठेवणार असल्याचे म्हटले असले तरी अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी अडवून धरली आहे. त्यामुळे इराणने थेट इंटरनेट केबलला लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. तसे झाल्यास भारतासह अनेक देशांतील इंटरनेट व्यवस्था ठप्प होऊ शकते.

इराणच्या शेजारी असलेल्या समुद्राच्या तळाशी इंटरनेट केबल्स आहेत. या केबल्सच्या माध्यमातून जगभरात इंटरनेट सेवा पुरवली जाते. इराणने या केबल्सचे नुकसान केल्यास जगभरातील इंटरनेट सेवा ठप्प होऊ शकते. मध्य पूर्वेतील युद्ध आतापर्यंत खनिज तेल, जहाजे, क्षेपणास्त्रे, ड्रोन्सपर्यंत मर्यादित होते. पण आता हा विषय डेटा वॉरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तसे झाल्यास भारतासह अनेक देशांची इंटनरेट केबल उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे भारतासह इतर देशांतील इंटरनेट व्यवहार पूर्णत: ठप्प होण्याचा धोका आहे.

इराणच्या रिव्होल्युशरी गार्ड कॉर्प्सशी (आयआरजीसी) संबंधित माध्यमांनी पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या केबल नेटवर्ककडे लक्ष वेधले आहे. याचा अर्थ इराणचे पुढील लक्ष्य समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल असू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी केवळ तेल वाहतुकीपुरती मर्यादित नाही. जगाला इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात ठेवण्यात या सामुद्रधुनीच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबल्सची भूमिका महत्त्वाची आहे. या भागातून अनेक आंतरराष्ट्रीय फायबर ऑप्टिक केबल जातात. त्या आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेला जोडतात. त्यामुळे या केबलचे नुकसान झाल्यास अनेक देशांमधील इंटरनेट सेवा ठप्प होण्याची भीती आहे.

होर्मुझमधून मोठी
डेटा ट्राफिक
जगातील डेटा ट्रॅफिकचा मोठा भाग होर्मुझची सामुद्रधुनी आणि पर्शियन आखातामधील केबल्समधून जातो. यूएई, सौदी अरेबिया, कतार, कुवेतच्या इंटरनेट लाईफलाईन याच भागातून जातात. लाल समुद्र आणि होर्मुझच्या आसपासच्या भागामधून डझनाहून अधिक केबल जातात. एकट्या लाल समुद्रातून जवळपास १५ ते २० केबल्स जातात. या माध्यमातून आशिया, युरोप, आफ्रिकेला इंटरनेट पुरवठा होतो.

जगातील ९५ टक्के
डेटा याच केबलमधून
एक-दोन केबल कापण्यात आल्यास जगावर होणारा परिणाम मर्यादित असेल. पण एकाचवेळी अनेक केबल्सचे नुकसान झाल्यास इंटरनेटचा वेग मंदावू शकतो. वेबसाईट्स डाऊन होऊ शकतात. बँकिंग, क्लाउड, डिजिटल सर्व्हिसेसवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. याबद्दल भारत पूर्णपणे सुरक्षित नाही. भारताचे जवळपास ६० टक्के इंटरनेट पश्चिमेकडे म्हणजेच मध्य पूर्व आणि युरोपकडे जाणा-या केबल्सच्या माध्यमातून चालते.

अमेरिकेवर दबाव
वाढविण्याचा प्रयत्न
इराणकडून अमेरिकेवर दबाव वाढविण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणा-या इंटरनेट केबलला निशाणा बनविले जाऊ शकते. इंटरनेट केबलचे नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीला खूप वेळ लागू शकतो. सध्या होर्मुझमध्ये जहाजे जात नसून केबलचे नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे चिंता वाढल आहे.

सुरूंग पेरणा-या
बोटी उडवा : ट्रम्प
एकीकडे इराण आक्रमक झालेला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला महत्त्वाचे आदेश दिले असून, होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये सुरूंग पेरत असल्याचा संशय असणा-या बोटीविरोधात प्राणघातक बळाचा वापर म्हणजेच या बोटी थेट उडवून देण्याचा आदेश दिल्याचे म्हटले आहे. सामुद्रधुनीत सुरुंग साफ करण्याची मोहीम आधीच सुरू केल्याचेही सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR