मुंबई : प्रतिनिधी
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सुशिक्षित लोकांनाही सापळयात अडकवून लुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत विस्तृत निवेदन करून लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले. कोणाही व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा कुठलाही कायदा वा नियम देशात नाही. त्यामुळे अशी कोणाला अटक करण्याची परवानगी नाही. डिजिटल अरेस्ट हा केवळ फ्रॉड आहे. कोणालाही तसा फोन आल्यास त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तात्काळ १९३० या क्रमांकावर तक्रार करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीद्वारे होणारी लूट रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी कृती दल स्थापन करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार नेमका काय असतो, ते समजावून सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या सभागृहाच्या माध्यमातून इथल्या सदस्यांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना सांगतो की, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाही. कायद्यात कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. त्यामुळे आपल्याला कुणी डिजिटल अरेस्टचा फोन केल्यास तो फसवा आहे, हे पाहिल्याच क्षणी समजून घ्या. त्यावर कधीही विश्वास ठेवू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डिजिटल अरेस्टचा
फ्रॉड कसा चालतो?
डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला व्हीडीओ कॉल येतो आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला तो कधी सीबीआयचा अधिकारी तर कधी पोलिस अधिकारी असल्याचे सांगतो. तुमच्या घरी पार्सल आले असून त्यात ड्रग्स आढळले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतो, असे तो सांगतो आणि मग २० लाख, ४० लाख रुपये मागतो. सामान्य माणूस घाबरून त्याला पैसे ट्रान्स्फर करतो. यामध्ये मोठ-मोठ्या अधिका-यांचीही फसवणूक झाली आहे.
१९३० क्रमांकाशी संपर्क साधा
कुणालाही डिजिटल अरेस्टसंदर्भात कॉल आल्यास तो फसवा आहे, हे समजा आणि त्याचक्षणी १९३० या क्रमांकावर कॉल करा. हा सायबरचा नंबर असून त्यामागे प्रचंड मोठी व्यवस्था उभी आहे. कोणी घाबरून घाबरून पैसे दिले असेल आणि लगेच १९३० या क्रमांकावर सांगितले तर गोल्डन अवरमध्ये तात्काळ हे पैसे थांबवू शकतो, अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. तरीही या फसवणुकीला बळी पडत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

