बंगळूर : वृत्तसंस्था
कर्नाटक भाजपात खदखद वाढली असून, भाजपच्या पाच असंतुष्ट नेत्यांच्या गटाने पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील दोन महत्त्वाच्या नियुक्त्यांवरून वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संभाव्य संघर्ष शक्य आहे.
माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. सोमण्णा हे या गटाचे नेतृत्व करणार असून, ७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, अरविंद बेल्लद, रमेश जारकीहोळी आणि माजी आमदार अरविंद लिंबावळी हे चार नेतेही सोमण्णा यांच्यासमवेत जाणार आहेत. बी. वाय. विजयेंद्र यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आर. अशोक यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याच्या भाजपच्या निर्णयावर पाचही जण टीका करत आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्या घरात येऊन माझा घात केला, असा संताप माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांनी व्यक्त केला. त्यांनी कुटुंबासह तुमकूर येथील सिद्धगंगा मठात जाऊन सिद्धलिंग स्वामीजींची भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर मठात सोमण्णा यांनी स्वामीजींसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.