19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून नाराजी

कर्नाटकात भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून नाराजी

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री येदियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्ष तर आर. अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी केलेली निवड अनेक भाजप नेत्यांना रुचलेली नाही.

विजापूरचे आमदार असलेले बसनगौडा पाटील-यत्नाळ, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या दोघांना बढती दिल्याबद्दल खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष व रा. स्व. संघाला मानणा-या सर्व आमदारांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक होता. लिंगायतांवर मजबूत पकड असलेल्या आणि येदियुराप्पा मुख्यमंत्री असेपर्यंत गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये ठामपणे त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या उत्तर कर्नाटकातील अनेक नेत्यांनी अशोक आणि विजयेंद्र यांच्या निवडीला विरोध दर्शवला आहे.

यासंदर्भात पंचमसाली मठाचे प.पू. जयमृत्युंजय स्वामीजी यांनी राज्यातील पक्षाची दोन्ही उच्च पदे बंगळुरू आणि शिमोगा येथील नेत्यांना घेऊन भाजपने उत्तर कर्नाटकातील नेत्यांवर अन्याय केला आहे, असे म्हटले आहे. बसनगौडा पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजपवर जोरदार टीका करताना स्वामीजींनी त्या दोन पदांपैकी एक पद तरी उत्तर कर्नाटकाला द्यावयास हवे होते, असे मत व्यक्त केले आहे. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी गेल्या शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन बी. एस. येदियुराप्पा मी एक वेळ स्वीकारले असते मात्र त्यांच्या पुत्राला नाही, असे सांगितले. तसेच माझ्यापेक्षा लहान असलेल्या विजयेंद्र यांच्या हाताखाली मी कसे काम करणार? त्या पदासाठी पक्षाने ज्येष्ठ नेत्यांचा विचार करावयास हवा होता, असेही स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR