परभणी : पालम तालुक्यातील वरखेड येथील शैलेश दशरथ घोडके आणि तुकाराम भुजंगराव गरुड या दोन युवकांना आज शुक्रवार, दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी पहिले कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार कैलास वाघमारे यांची उपस्थिती होती. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीने परभणी जिल्ह्यातील कुणबी मराठा समाजाच्या नोंदी तपासण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा केला होता. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय कार्यालयातील कागदपत्रांच्या नोंदी आणि नागरिकांनी सादर केलेले पुरावे तपासून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत हा प्राथमिक अहवाल स्विकारला. मुख्यमंत्री शिंदे यांनी अहवाल स्विकारल्यानंतर कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे सादर करणा-यांना तात्काळ जात प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज शुक्रवारी वरखेड गावातील दोन युवकांना कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचे जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पालम तालुक्यातील वरखेड येथील शैलेश घोडके आणि तुकाराम गरुड यांच्या आजोबा-पणजोबांच्या हक्क नोंदणी प्रमाणपत्राच्या शासन दरबारी नोंदी, वंशावळी आणि वारसा नोंदी आढळून आल्या आहेत. या सर्व नोंदींसोबत या युवकांकडील कागदपत्रे जुळली असून, यामुळे या युवकांच्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितले.
सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनाकडे पाठवलेल्या अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यातील सर्व संबंधीत विभागाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे २० लाख ७५ हजार नोंदी तपासल्या असून त्यापैकी सन १८८३ ते सन १९१० या कालावधीतील २ हजार ४१ नोंदीचे पुरावे प्रशासनाला सापडले आहेत. यात महसुली, शैक्षणिक, भूमी अभिलेख आदी विभागाकडील कच्च्या आणि पक्क्या नोंदी, हक्कनोंद, नमुना १२, त्यासोबतच खासरा उता-यांच्या नोंदी सापडल्या असून यामुळे कुळातील किंवा कुटूंबातील अनेक सदस्यांना याआधारे प्रमाणपत्र देण्यासाठी मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांच्या वंशावळी, वारसा नोंदी जुळल्यानंतर त्यांना कुणबी मराठा-मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे दाखले देण्यात येणार असून, जिल्ह्यात मराठा समाजातील युवकांना हे जात प्रमाणपत्र वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी संबंधीत कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले आहे.
भविष्या प्रमाणपत्राचा नक्की फायदा होईल : शैलेश घोडके
माझे वडील शेतकरी असून आमच्याकडे १ एकर शेती आहे. मी सध्या कला शाखेत शिक्षण घेत असून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मला आज कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद होतो आहे. मला भविष्यात शिक्षण आणि नोकरीसाठी या जात प्रमाणपत्राचा नक्कीच फायदा होईल, असे मत कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळालेल्या पालम तालुक्यातील वरखेड येथील शैलेश दशरथ घोडके यांनी व्यक्त केले आहे.