नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चेंगराचेंगरी होईल अशी भीती प्रशासनाला वाटते. त्यासाठी २० किलोमीटर लांब असलेल्या रस्त्यांवरील घरे पाडण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील या कारवाई विरोधात असंतोष वाढत आहे.
गेले दहा दिवस या प्रश्नावर कैलास खांडबहाले यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. शेतक-यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी हे काम थांबविण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिंहस्थ कुंभमेळा येईल आणि जाईल. त्यासाठी स्थानिक शेतक-यांना का उद्ध्वस्त केले जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार राऊत यांनी एनएमआरडीएच्या कारवाईवर अनेक आक्षेप घेतले आहेत. कारवाईमुळे तीन ते चार हजार शेतकरी बाधित होणार आहेत. शासनाची परवानगी घेऊन बांधलेली घरे, बांधकामे कोणत्या नियमाने पाडली जात आहेत. एनएमआरडीएची ही एकतर्फी कारवाई तातडीने थांबवण्याची आवश्यकता आहे. शासनाला जमीन हवी असल्यास रीतसर पंचनामे करून संपादित करावी. त्याचा नियमानुसार चर्चा करून शेतक-यांना मोबदला द्यावा असे त्यांनी म्हटले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वर शहरात कुशावर्त आणि नाशिक शहरात रामकुंड येथे होतो. भाविकांची सर्व गर्दी तेथे असते. त्यामुळे चेंगराचेंगरी झालीच तर शहरात होईल. २० किलोमीटर लांब त्रंबकेश्वर रस्त्यावर कशी चेंगराचेंगरी होईल? असा गंभीर प्रश्न त्यांनी केला.

