लातूर: लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचा आधारस्तंभ, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज, २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे.
डॉ. गोपाळराव पाटील हे व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ होते. लातूरसारख्या भागात त्यांनी आरोग्य सेवेचा मोठा पाया रचला. केवळ डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर ‘गोरगरिबांचा कैवारी’ म्हणून त्यांची ओळख होती. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.
लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची जगभर ओळख निर्माण करण्यात डॉ. गोपाळराव पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत आणि गुणवत्तेत चमकले पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता.
त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, मुलगा सच्चिदानंद पाटील, मुली लताबाई, गीताताई, ताराबाई, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे क्रीडा मैदान, नवीन एमआयडीसी (संत तुकाराम शाळेजवळ), लातूर येथे डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
“डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने लातूरच्या शैक्षणिक चळवळीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशा शब्दांत विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
