मुंबई: प्रसिद्ध आयवेअर स्टार्टअप ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कंपनीच्या अंतर्गत ‘ग्रूमिंग गाईड’मधील वादग्रस्त नियमांमुळे सोशल मीडियावर सुरू झालेल्या संतापजनक प्रतिक्रियेचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला आहे. सोमवारी बाजार सुरू होताच लेन्सकार्टच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली, ज्यामुळे शेअरची किंमत ₹५०८.७ या नीचांकी पातळीवर आली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लेन्सकार्टचे एक कथित ‘स्टाईल गाईड’ व्हायरल झाले होते. या दस्तऐवजात कर्मचाऱ्यांच्या पेहरावाबाबत काही नियम देण्यात आले होते, ज्यावरून भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला. व्हायरल झालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी टिकली (Bindi), टिळा (Tilak) आणि कलावा (धार्मिक धागा) वापरण्यास मनाई करण्यात आली होती.एका बाजूला हिंदू धार्मिक चिन्हांवर निर्बंध असताना, दुसऱ्या बाजूला हिजाब आणि पगडीला काही अटींसह परवानगी देण्यात आल्याने नेटकऱ्यांनी ‘दुहेरी निकष’ लावल्याचा आरोप केला. या प्रकरणावरून ट्विटरवर (X) #BoycottLenskart हा ट्रेंड सुरू झाला आणि अनेक ग्राहकांनी आपले लेन्सकार्ट ॲप अनइन्स्टॉल केल्याचे फोटो शेअर केले.
सोशल मीडियावरील या प्रचंड विरोधामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे सोमवारी सकाळी विक्रीचा दबाव वाढला आणि कंपनीचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घटले. विशेष म्हणजे, मागील काही काळ उत्तम कामगिरी करणाऱ्या लेन्सकार्टला या एका वादामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ पियुष बन्सल (Peyush Bansal) यांनी स्वतः समोर येत स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दस्तऐवज जुना आणि ‘कालबाह्य’ (Outdated) आहे. तो कंपनीच्या सध्याच्या अधिकृत धोरणांचा भाग नाही. कंपनीने नवीन ‘इन-स्टोअर स्टाईल गाईड’ सार्वजनिक केले आहे. यात बिंदी, टिळा, सिंदूर, कलावा, हिजाब आणि पगडी यांसह सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांना स्पष्टपणे परवानगी देण्यात आली आहे.
“आमच्या कोणत्याही संवादामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही मनापासून दिलगीर आहोत. लेन्सकार्ट हा भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेला ब्रँड आहे,” असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

