29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरमोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सकाळी ११ वाजल्यापासून शहरातील मुख्य पाच मार्ग बंद केले होते. तर सभेला येणा-यांसाठी सहा ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी ३ नंतर शहरातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यात आली. या दरम्यान २० मिनिटे अंत्ययात्राही रोखण्यात आली होती.

सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद मोदी यांची होम मैदानावर सभा झाली. या सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संमेश्वर कॉलेज, रंगभवन, सिद्धेश्वर प्रशाला परिसर, पार्क चौक, डफरीन चौक आदी ठिकाणची वाहतूक सकाळी ११ दुपारी ३ वाजेपर्यंत इतरत्र वळविण्यात आली होती. हे शहरातील मुख्य मार्ग असल्याने रिक्षा, टमटमसह इतर नियमित प्रवासी वाहतूकही सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत बंद होते. सायंकाळच्या सत्रात प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यात आली.

त्याचबरोबर सभेला येणा-या नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्याकरिता शहरात सहा ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून आलेली वाहने पार्क चौकात उतरवून जुनी मिल कंपाउंड व मरिआई चौक येथील एक्झिबिशन ग्राउंडवर तर अक्कलकोटकडून येणारी वाहने सिव्हिल चौकात नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नूमवि प्रशालेच्या मागे मुलांचे शासकीय वसतिगृह मैदानावर लावण्यात आली.

होटगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड, पत्रकार भवन मोदी पोलिस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाइड मैदान, नूमवि प्रशालेमागे आणि मुलांचे शासकीय वसतीगृह मैदानावर लावण्यात आली. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे नागरिकांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले होते.

२० मिनिटे अंत्ययात्रा रोखली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिस प्रशासनावर होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बंदोबस्तामध्ये सुरक्षेबाबत तडजोड केली गेली नाही. सात रस्ता येथे अंत्ययात्रा आली होती. मात्र तब्बल २० मिनिटे ही अंत्ययात्रा रोखण्यात आली. सभा संपल्यानंतर त्यांना मार्ग काढून देण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR