जळगाव/ बुलडाणा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेरपाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातही आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हा धक्का बसला असून, अनेक नागरिकांच्या घरातील साहित्य हलल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असून, तेथे ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील शनिवारी सकाळी ९:१५ वाजता भूकंपाचे झटके बसले. अचानक जमीन हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी आहे. भूकंपाचे केंद्र जमीनखाली १० किलोमीटर आत होते. या भागात सौम्य भूकंप आला. त्यात कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. इतरही नुकसानीची सध्या माहिती हाती आलेली नाही.
हतनूर धरण परिसातील चौकीही हादरली
हतनूर धरण येथेही भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ९ वाजता १५ मिनिटे जमीन दोन ते तीन सेकंद हादरल्याची माहिती मिळत आहे. धरण परिसरातील चौकी हादरल्याचे कर्मचा-यांनी सांगितले. या धरण परिसरातील भूकंप निरीक्षण यंत्रणा बंद असल्याने भूकंपाची नेमकी तीव्रता किती होती हे समोर आले नाही.
गेल्या महिन्यात पालघरमध्ये धक्का
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्याला सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरात ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.कधी रात्री तर कधी दिवसा भूकंपाचे सौम्य धक्का जाणवले होते.
हिंगोलीसह नांदेडलाही यापूर्वी हादरे
हिंगोली आणि नांदेडच्या सीमावर्ती भागांत गेल्या काही दिवसांत रिश्टर स्केलवर ३ ते ४ तीव्रतेचे अनेक भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. जुलै महिन्यात हे धक्के जाणवले. केंद्राच्या भूगर्भीय संशोधन संस्थांकडून यावर लक्ष ठेवण्यात येत असले, तरी वारंवार भूमी का कंप पावते याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. विशेषत: डेक्कन ट्रॅपमधील फॉल्ट लाईन्स आणि भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा किंवा हालचाली यामागे कारणीभूत असू शकतात, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
















