भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी सकाळी अचानक झालेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात दुस-यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी ठीक ९.१५ वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी मोजण्यात आली. अवघ्या ३ ते ४ सेकंद जमिनीला तीव्र हादरे बसल्याने घरातील सामान हलले आणि नागरिक जीव मुठीत धरून पळत घराबाहेर आले.
हवामान व भूकंपशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सातपुडा भागात होते. हे केंद्र खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली तब्बल १० किलोमीटर खोलीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भूकंपाचे धक्के केवळ खरगोनमध्येच नव्हे तर सेंधवा, खंडवा, बुरहानपूर आणि भीकनगाव या सीमावर्ती भागांतही तीव्रतेने जाणवले.
विशेष म्हणजे, यापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१४ वाजताही खरगोन जिल्ह्यात ४.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, खरगोनमधील या भूकंपानंतर शनिवारी सकाळी १०.२९ वाजता लेह-लडाख भागातही ३.९ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.
















