28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट

ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट

जेरुसलेम : गाझामध्ये ४९ दिवस हमास अतिरेक्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली महिला आणि मुलांची अत्यंत भावुक वातावरणात आपल्या परिवारासोबत पुनर्भेट झाली. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर झालेल्या कराराअंतर्गत या इस्रायली नागरिकांना हमासने सोडले आहे.

श्निडर चिड्रन्स मेडिकल सेंटरच्या (एससीएमसी) वतीने जारी करण्यात आलेल्या एका व्हीडीओत ओहद मुंदेर (वय ९) हा मुलगा धावत जाऊन आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारताना दिसून येतो. ओहद याची हमासने सुटका केली आहे. त्याच्यासोबत त्याची ५५ वर्षीय आई केरेन मुंदेर आणि ७८ वर्षीय आजी रुती मुंदेर यांनाही सोडण्यात आले आहे. रुतीचा पती अवराम मुंदेर मात्र अजून गाझामध्ये हमासच्याच ताब्यात असून त्याच्या सुटकेची प्रतीक्षा आहे.

सुटकेसाठी राबविली मोहीम
– हमासच्या ताब्यात असतानाच ओहद ९ वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस संपूर्ण इस्रायलमध्ये साजरा केला होता.
-रुबीक्स क्यूब जुळविण्यात तरबेज असलेल्या ओहदच्या सुटकेसाठी नागरिकांनी मोहीम चालविली होती.
– त्यासाठी पझल क्यूबच्या माध्यमातून ओहदची एक प्रतिमा बनविली होती.

सर्वांच्या सुटकेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार
ओहदचा भाऊ रॉय झिक्री मुंदेर याने व्हिडीओमध्ये म्हटले की, सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही ४९ दिवस टिकाव धरू शकलो. सर्व इस्रायली लोकांना धन्यवाद. मात्र, आपण आज आनंदोत्सव साजरा करणार नाही. कारण, अजूनही आपले काही लोक ओलीस आहेत. सर्वांच्या सुटकेपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR