लंडन : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सलग तिस-या सामन्यात एकहाती पराभूत करत इंग्लंडच्या संघाने इतिहास रचला. ब्रिस्टलच्या मैदानातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर १५८ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक आणि फिल सॉल्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने ८९ चेंडूत सामना संपवत मालिका खिशात घातली. १४ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गमावली.
इंग्लंड आणि भारत यांच्यात २०१२ पासून द्विपक्षीय टी-२० मालिका खेळण्यात येत आहे. १४ वर्षांत ६ पैकी ५ मालिका भारतीय संघाने जिंकल्या होत्या. या दोन्ही संघातील पहिली वहिली मालिका बरोबरीत सुटली होती. सातव्या द्विपक्षीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मोठ्या बदलासह मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला हा रेकॉर्ड कायम राखणं जमलं नाही. इंग्लंडच्या संघाने सलग तीन सामन्यात एकतर्फी बाजी मारत अखेर भारतीय संघाविरुद्ध पहिली वहिली टी-२० मालिका जिंकली.
ब्रिस्टलच्या मैदानात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी श्रेयस अय्यर एकटा लढला. दुस-या बाजूला एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. इंग्लंड दौ-यातील दुस-या टी-२० सामन्यात पदार्पणात इतिहास रचणारा वैभव सूर्यवंशी सलग तिस-या सामन्यात अपयशी ठरला. अभिषेक शर्मा, ईशान किशन स्वस्तात माघारी फिरल्यावर उप कर्णधार तिलक वर्मा आणि मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या शिवम दुबेलाही मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस अय्यरने केलेल्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, जोश टंग यांनी प्रत्येकी २-२ तर विल जॅक्स आणि अदिल राशीद यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
















