40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेची एन्ट्री; शिंदे अन् पवारांना फटका?

मनसेची एन्ट्री; शिंदे अन् पवारांना फटका?

मुंबई: प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीला यंदाच्या लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत आल्याने याचा चांगलाच फायदा भाजप आणि महायुतीला होईल यात काही शंका नाही. मात्र राज ठाकरेंच्या या निर्णयाचा शिंदेंना आणि अजित पवारांना फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवाजी पार्कवरील सभेमध्ये राज ठाकरे नक्की कोणती भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. मनसे नेत्यांनी या भूमिकेचे स्वागत केले तर महायुतीतील घटक पक्षांनी आणि भाजपाने देखील याचे समर्थन केले. मात्र याचा थेट परिणाम हा आगामी निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर होण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये ज्यावेळेस जागावाटपाचा विषय येईल तेव्हा दोन्ही पक्षांना याचा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. त्याव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही असाच काही फटका मनसेमुळे शिंदे-पवारांना बसू शकतो, अशी चर्चा आहे. कारण जागावाटपावेळी या दोन्ही पक्षांना आपल्या गोटातून मनसेला काही जागा द्याव्या लागू शकतात.

काही राजकीय जाणकारांच्या मते ठाकरे यांच्या पाठिंब्याचा शिंदे आणि अजित पवार यांना महायुतीमध्ये फटका बसेल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे मनसे आणि शिंदे, पवारांची व्होट बँक वेगळी आहे. अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग वेगळा आहे. तर शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग हा अगदीच वेगळा आहे.

मनसेला १.५ ते २ टक्के मते मिळतात ज्याचा फायदा लोकसभेत महायुतीला होईल. मात्र याचा फटका आगामी काळात शिंदे-पवारांना बसेल असे वाटत नाही. तर दुसरीकडे ठाकरेंनी जर भाजपाच्या विरोधात प्रचार केला असता तर याचा फटका आताच्या लोकसभेमध्ये काही प्रमाणावर महायुतीला बसला असता. यामुळेच मनसेला महायुतीमध्ये सोबत घेतले असावे असे देखील काहींचे मत आहे.

मोदींना पुन्हा संधी देणे गरजेचे
राज ठाकरे पुढे म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नरेंद्र मोदी नसते तर, हा मुद्दा प्रलंबित राहिला असता. आता पुन्हा एकदा त्यांना संधी देणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे. अनेक मुद्दे आहेत विकासाच्या दृष्टीने ते मोदी पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. तरुणांना रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे अनेक विषय मार्गी लावतील, अशी अपेक्षा आहे.

महायुतीत प्रचार करण्यासाठी बैठक
मोदी गुजरातचे आहेत, त्यांचे गुजरात प्रेम ठीक आहे, पण सर्व राज्यांमध्ये त्यांनी त्याचप्रकारे लक्ष द्यावे. पाठिंबा दिला त्या संदर्भात पक्षातील नेत्यांशी संवाद साधला. महायुतीत प्रचार करण्यासाठी आणि समन्वय करण्यासाठी आमची बैठक झाली, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. लवकरच समन्वय साधण्यासाठी आमची यादी काही दिवसांत जाहीर होईल.

शिंदे, फडणवीस, पवारांसाठी सभा घेणार?
मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना जबाबदारी देण्यात येईल आणि संबंधितांच्या नावांची यादी महायुतीला देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, महायुतीच्या प्रचारासाठी स्वत: राज ठाकरे उतरणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार का, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. दरम्यान, सभा घेण्यासंदर्भात निर्णय पुढे बघू, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR