नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून ते दाऊदचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकांवर नवाब मलिक यांनी हजेरी लावली. यानंतर एकच रणकंदन माजले. ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचे, असा आरोप भाजपवर होऊ लागला. त्यात भर म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांच्यावर जोवर आरोप आहेत तोपर्यंत त्यांना महायुतीचा भाग करून घेऊ नये असे सांगणारे पत्र धाडले आहे. याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे, मलिक यांच्याशी बोलून त्यांची भूमिका काय आहे हे पाहिल्यानंतरच मी माझा निर्णय आणि पक्षाची भूमिका जाहीर करीन असे त्यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेल्या पत्राबाबत अजित पवार म्हणाले की, त्या पत्राचे काय करायचे ते मी करीन, मी तुम्हाला (मीडिया) सांगून करणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली त्याचबरोबर प्रत्येकाला त्याचबरोबर मी पत्र वाचले आहे, असे त्यांनी सांगितले. कोण कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनी दाखवून दिले असेही ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या अनुषंगाने पाठवलेल्या पत्रावर कोणती भूमिका आहे? अशी विचारणा केली असता अजित पवारांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नवाब मलिक यांना वैद्यकीय ग्राउंडवर जामीन मिळाल्यानंतर ते सध्या बाहेर आहेत. नवाब मालिकांमुळे सत्ताधाऱ्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.