बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं, अशी माहिती समोर येत आहे.
या विमानामधून कोण कोण प्रवास करत होते, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र या अपघातात विमानामधील काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

