नवी दिल्ली : सीमेवरील महत्त्वाच्या ठिकाणांवर शत्रू ड्रोन हल्ला करू शकतो. जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सागरी सुरक्षा विभागाने जमीन आणि सागरी सीमांजवळ असलेल्या महत्त्वाच्या मालमत्ता आणि ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याबाबत अलर्ट जारी केला आहे.
आपल्याला लवकरात लवकर ठोस पावले उचलावी लागतील, विशेषत: सीमेजवळच्या आपल्या ठिकाणांना धोकादायक ड्रोन्सपासून वाचवण्यासाठी अँटी-ड्रोन सिस्टीम लावावी लागेल. जगातील सध्याची परिस्थिती पाहता हे स्पष्ट आहे की शत्रूचे ड्रोन्स आपल्या महत्त्वाच्या ठिकाणांचे कामकाज ठप्प करू शकतात. या इशा-यानंतर, सुरक्षा यंत्रणा देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी-ड्रोन सिस्टीम बसवण्याच्या कामाला लागल्या आहेत.
गृह मंत्रालयानेही सीमा सुरक्षा दलाच्या अंतर्गत एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीचे काम भारतासाठी सर्वोत्तम अँटी-ड्रोन सिस्टीमची तपासणी करणे आणि त्यांना मान्यता देणे आहे. सूत्रांनी सांगितले की, बीएसएफ पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या भागांमध्ये या सिस्टीम बसवण्याची तयारी करत आहे आणि यासाठी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने देखील एक टीम तयार केली आहे. या टीममध्ये संरक्षण संशोधन संस्था, इंटेलिजन्स ब्युरो, एअरपोर्ट अथॉरिटी आणि बीएसएफचे अधिकारी समाविष्ट आहेत, जे देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत आहेत. या संघाच्या अहवालानंतर आणि गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच कोणत्या ठिकाणी कोणती अँटी-ड्रोन प्रणाली स्थापित केली जाईल हे निश्चित होईल.
अँटी-ड्रोन प्रणाली स्थापित
तमिळनाडूच्या थूथुकुडी येथे व्ही.ओ. चिदंबरनार बंदर आहे. बंदराच्या सुरक्षेसाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये येथे प्रगत अँटी-ड्रोन प्रणाली स्थापित करण्यात आली. अशी प्रणाली स्वीकारणारे हे देशातील पहिले बंदर आहे. यासाठी बंदराने सरकारी कंपनी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत करार केला आहे. या प्रकल्पांतर्गत, रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडारवर आधारित एक अशी प्रणाली स्थापित केली जात आहे, जी केवळ शत्रूच्या ड्रोनला ओळखणार नाही, तर त्याला जाम देखील करेल. ही प्रणाली बंदराच्या वातावरणाला अनुसरून तयार करण्यात आली आहे, जी चोहोबाजूंनी म्हणजेच ३६० अंशावर लक्ष ठेवेल. हे पाऊल देशाची हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकारच्या अमृत काल व्हिजन २०४७ आणि मॅरिटाइम इंडिया व्हिजन २०३० च्या उद्दिष्टांनुसार उचलण्यात आले आहे.
















