नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील एका मल्टिनॅशल आयटी कंपनीत हिंदू कर्मचारी महिला व मुलींवर लैगिंक अत्याचार आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ८ हिंदू मुलींनी व एका पुरुषाने तक्रार दिल्यानंतर तब्बल ९ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र आता याप्रकरणी कंपनीची पुणे येथील महिला एचआर हेड अश्विनी चैनानी हिला एसआयटी पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने तिला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलांनी वारंवार ई-मेलद्वारे तक्रार करूनही एचआर हेड चैनानी हिने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. ‘कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असं होत राहतं… असे उत्तर देत प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप आहे. यातून तीने संशयितांना पाठीशी घातल्याची शक्यता तपासली जात आहे. एचआर हेडने दुर्लक्ष केल्याचेच या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांना काल न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी नाशिक सेंट्रल जेलला करण्यात आली आहे. मात्र एसआयटी त्यांना दुस-या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तर महिला एचआर हेडला पोलिस कोठडी सुनावली. आतार्यंत एकुण सात जणांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील महिला संशयित निदा खान अद्याप फरार आहे.
याप्रकरणातील आरोपींकडून महिलांवर अत्याचार करणे, नमाज पठणाची सक्ती करणे आणि इच्छेविरुद्द मांसाहार खाउ घालण्याचे गंभीर प्रकार घडले. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अत्यंत गोपनीय मोहीम राबवली. एका वरिष्ठ अधिका-यासह सात महिला पोलिसांनी वेशांतर करुन कंपनीत आपला वावर ठेवला. दोन आठवडे तिथे घडणा-या घटनांवर पाळत ठेवत संशयितांना अटक केली.

