20.9 C
Latur
Sunday, September 15, 2024
Homeराष्ट्रीयपाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार; बीएसएफचा एक जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार; बीएसएफचा एक जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये सीमेवर पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला असून बीएसएफने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. बीएसएफने निवेदनात म्हटले आहे की, ८-९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री, पाकिस्तान सैन्याने रामगढ भागात कोणतेही कारण आणि चिथावणी न देता गोळीबार केला. बीएसएफ जवानांनी पाकला प्रत्युत्तर दिले. यामध्ये बीएसएफचा जवान जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लाल फर्न किमा असे जवानाचे नाव आहे.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बीएसएफ जवानाला रामगढ सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. यानंतर त्यांना जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तीन आठवड्यांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही तिसरी वेळ आहे. १७ ऑक्टोबर रोजी पाक रेंजर्सनी पहिला गोळीबार केला होता. यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्याचवेळी, २६ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा जम्मूच्या अरनिया आणि सुचेतगड सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चार वाजता गोळीबार थांबला. हे गाव झिरो लाईनवर येत असल्याने शाळा प्रशासनाने येथे बसेस पाठविण्यास नकार दिला आहे. तसेच काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत कारण त्यांना गोळीबार कधी सुरू होईल हे माहिती नाही.

एक दहशतवादी ठार
बुधवारी रात्री उशिरा शोपियानच्या कटोहलन भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ ) एक दहशतवादी मारला गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR