28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडारसिक मोहिनी!

रसिक मोहिनी!

माणसाला मद, मोह, मत्सर असतो, त्याचप्रमाणे काही गोष्टींचा छंद, मोहिनी असतेच. काही जणांना वाचनाचा, पर्यटनाचा, गाणी ऐकण्याचा छंद असतो, आवड असते. कोणाचे रसिकपण कशात दडले आहे ते सांगता येत नाही. व्यक्तिपरत्वे ते भिन्न भिन्न असते. एखाद्याला सिनेमा पाहण्याचे वेड असते तर खेळाची आवड असणा-याला सामने पाहण्याचे वेड असते. स्टेडियमवर जाऊन सामना पाहण्यातील मजा काही औरच आहे अर्थात त्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. गर्दी अन् गोंगाट सहन करत सामना पाहण्याचे सोपस्कार पूर्ण करावे लागतात. आजकाल थेट प्रक्षेपणाची सोय असल्याने होणारा त्रास टाळता येऊ शकतो पण थेट मैदानावर उपस्थित राहून जे काही घडतेय ते ‘याचि देही याचि डोळा’ पाहणे यातील मजा काही औरच आहे. प्रेक्षकांचा गोंगाट आणि टाळ्यांच्या कडकडाटासाठी खेळाडूही आसुसलेले असतात. सध्या भारतात विश्वचषक स्पर्धेचा कुंभमेळा सुरू आहे.

प्रत्येक सामन्याला पे्रक्षकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता बीसीसीआय आणि पर्यायाने आयसीसी मालामाल होणार यात शंका नाही. काही जण रसिक प्रेक्षकांची श्रेणीही ठरवतात. जगात सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार म्हणून फुटबॉलची ओळख आहे. त्यानंतर क्रिकेटचा क्रम लागतो. क्रिकेट हा खेळ जगात काही देशांतच खेळला जातो परंतु त्याला मिळालेली रसिकमान्यता फुटबॉलच्या तोडीस तोड आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने ४९ वे एकदिवसीय शतक फडकावले. त्याची शंभरावी धाव जगभरात साडेचार कोटी प्रेक्षकांनी पाहिली म्हणे! इंग्लंडमधील क्रिकेट रसिक अधिक जाणकार मानले जातात. एखाद्या चांगल्या फटक्याला, क्षेत्ररक्षणाला ते टाळ्या वाजवून दाद देतात मात्र पुढल्या क्षणाला ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ असतो. भारतातील रसिक प्रेक्षकांच्या गोंगाटाला नाके मुरडली जातात अर्थात त्या गोंगाटातील गावरान गोडवा सभ्य गृहस्थांना काय माहीत!

सध्या सुरू असलेल्या विश्व चषक स्पर्धेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे, मग सामना कोणत्याही देशाचा असो. बाद फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता साखळीतील सामने ही केवळ औपचारिकता आहे. तरीसुद्धा स्टेडियम तुडुंब भरलेले असते. शनिवारी पुण्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया-बांगला देश सामन्याला ३३ हजार प्रेक्षक उपस्थित होते. भारतीयांच्या या क्रिकेटवेडाला काय म्हणावे?… काही म्हणण्यापेक्षा वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात गुणगुणूया …‘मृगनयना रसिक मोहिनी, कामिनी होती ती मंजुळ मधुरा लावी रसिक मोहिनी’.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR