जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता राजस्थानमधील विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नवे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
कन्हैया लालच्या हत्येच्या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल, तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, हा माझा विषय नाही. निवडणूक जिंकणे हे माझे काम होते आणि आता पुढे सेवा करेन. उत्तर आणि दक्षिणेच्या राजकारणावर बाबा बालकनाथ म्हणाले की, तेलंगणात मतांची टक्केवारी वाढली आहे.
भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. भाजपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. नरेंद्र मोदी तिथेही खूप लोकप्रिय आहेत, देशात आणि परदेशात सर्वत्र लोकप्रिय आहेत. हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ असून तिजारा विधानसभेच्या जनतेने मला साथ दिली असल्याचे ते म्हणाले. या विजयामागचे मुख्य कारण काय, असे त्यांना विचारले असता, गेहलोत यांच्याकडे कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. ती फक्त खोट्या गोष्टींची पेटी होती, प्रत्यक्षात काहीही नव्हते. पहिल्या १० दिवसांत शेतक-यांची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले. आम्हाला सेवा कशी करायची हे माहित आहे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आहे आणि सर्व नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असे ही त्यांनी म्हटले.