22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरमहिलेकडून सोन्याचे दागिने जप्त, तीन लाख १९ हजारांचा ऐवज हस्तगत

महिलेकडून सोन्याचे दागिने जप्त, तीन लाख १९ हजारांचा ऐवज हस्तगत

सोलापूर – बसस्थानकावर तीन महिलांचे दागिने लुटणाऱ्या कलबुरगी येथील एका संशयित महिलेला अटक करुन तिच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले. त्याचबरोबर अन्य दोन आरोपींना अटक करुन दुचाकी व वाहनांच्या बॅटऱ्या असा तीन लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली आहे.

शहरातील एस.टी. स्टैंड येथे प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील चोन्याचे दागिने चोरीस गेल्याच्या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन अभ्यास केला. संशयित महिला ही लकी चौक येथून दत्त चौक मार्गे सराफ कट्टा येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावून सोनम मंजुनाथ कांबळे (वय ३६, रा. सरकारी दवाखान्याजवळ, बापूनगर, सेडम रोड, कलबुरगी) हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून बसस्थानकावरुन चोरलेल्या तीन गुन्ह्यातील दोन लाख ४०हजारांचे दागिने जप्त केले.

तसेच छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज गेटच्या समोरून चोरीस गेलेली दुचाकी कल्लेश्वर बब्रुवान वचने (वय २६, रा. होळी, ता. लोहारा, जिल्हा धाराशिव) यांच्या ताब्यातून जप्त केली. चोरलेले छोटा हत्ती वाहन व जीपच्या बॅटऱ्या गणेश उत्तम चव्हाण (वय ३७, रा. बुधवार पेठ, सम्राट चौक) याच्या ताब्यातून हस्तगत केल्या. महिलेसह तीन आरोपींकडून एकूण तीन लाख १९ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद, विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस अंमलदार प्रवीण चुंगे, अजय पाडवी, अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड, कृष्णाथ बडुरे,विनोद व्हटकर आदींनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR