37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरगट नंबर दोन ते महाळुंग रस्त्याचा प्रश्न प्रलंबित

गट नंबर दोन ते महाळुंग रस्त्याचा प्रश्न प्रलंबित

जांबूड : गट नंबर दोन ते महाळुंग (ता. माळशिरस) येथील रस्ता गेल्या ४५ वर्षापासून प्रलंबित आहे. महाळुंग श्रीपूर नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्यानंतर ग्रामस्थांना हा रस्ता होईल, असे वाटले होते. गेल्या तीन वर्षांपासून निवडून गेलेले नगरसेवक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे गट नंबर दोनमधील रस्त्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे. गट नंबर दोन ते महाळुंग हा चार किलोमीटरचा रस्ता आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या रस्त्यासाठी आंदोलन, उपोषण केले तसेच मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना पत्र देऊन या रस्त्याचा प्रश्न
सोडविण्यासाठी विनंती केली.

नव्याने स्थापन झालेल्या महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीमध्ये आजतागायत रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. नगरविकास मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असे ग्रामस्थांना वाटले. या विभागातून तीन नगरसेवक निवडून गेले; पण त्यांनी एकदाही हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. या रस्त्यावर एक पाऊस पडला तर नागरिकांना रस्त्यांवर चालण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे त्यावर मुरूम टाकण्याऐवजी येथील प्रशासनाने मोठी दगडे आणून टाकली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागत आहे. महाळुंग हे गाव माढा मतदारसंघामध्ये येत आहे. निवडून येणारे खासदार हा प्रश्न मार्गी लावतील का, अशी विचारणा ग्रामस्थांमधून होत आहे.

गट नंबर दोन येथील लोकसंख्या जवळपास तीन ते चार हजारांपर्यंत गेली आहे. या विभागामध्ये प्रभाग क्र. एक, दोन व सात यांचा समावेश होत आहे. यामधून प्रभाग क्रमांक एकमधून कल्पना काटे, प्रभाग क्रमांक दोनमधून राहुल रेडे, प्रभाग क्रमांक सातमधून तानाजी भगत असे तीन नगरसेवक निवडून गेले आहेत. या तिन्ही नगरसेवकांनी आतापर्यंत एकदाही रस्त्याचाप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच आतापर्यंत एकही विकासाचे काम केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR