16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरुग्णालये बनलीत युद्धभूमी

रुग्णालये बनलीत युद्धभूमी

जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण गाझात सर्वत्र बॉम्बहल्ल्याच्या खुणा

खान युनिस : गाझा पट्टीतील सर्वांत मोठे रुग्णालय असलेले आणि मागील काही दिवसांपासून संघर्षाचे केंद्र बनलेले अल शिफा रुग्णालयाला युद्धभूमीची कळा आली असल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) अधिका-यांनी नोंदविले आहे. हे रुग्णालय आता पूर्णपणे रिक्त केले गेले असले तरी येथे सर्वत्र बॉम्बहल्ल्याच्या आणि गोळीबाराच्या खुणा दिसत होत्या.

अल शिफा रुग्णालयाच्या परिसरात हमासचे दहशतवादी लपले असल्याचे सांगत इस्राईलकडून अनेक दिवसांपासून येथे जोरदार बॉम्बहल्ले सुरु आहेत. यावरून इस्राईलवर प्रचंड टीका झाली होती. काल (ता. १८) बहुतांश रुग्ण आणि रुग्णालय कर्मचा-यांना सुरक्षितस्थळी हलविल्यानंतर आज सैनिकांनी रुग्णालयातील आणखी २९१ रुग्णांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थितीत असलेल्या ३२ बालकांचाही समावेश होता. अद्यापही किमान तीनशे रुग्ण असल्याचे इस्राईलने सांगितले. यानंतर ‘डब्लूएचओ’ अधिका-यांनी एक तासासाठी रुग्णालयाला भेट दिली. हे रुग्णालय म्हणजे युद्धभूमीच असल्याचे या अधिका-यांनी सांगितले. रुग्णालयात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याच्या आणि गोळीबार झाल्याच्या खुणा दिसत आहेत.

प्रवेशद्वाराजवळ तर अनेक जणांना दफन केल्याचेही आढळून आले. रुग्णालयाच्या आवारात जवळपास ८० जणांना पुरल्याचे वर वर केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. अद्यापही रुग्णालयात असलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

करारासाठी प्रयत्न सुरु
हमासने सात ऑक्टोबरला हल्ला केल्यानंतर अपहरण केलेले दोनशेहून अधिक जण अद्यापही त्यांच्याच ताब्यात आहेत. या सर्वांची सुटका करण्यासाठी इस्राईल, हमास व अमेरिका यांच्यात कराराबाबत बोलणी सुरू असल्याचे अमेरिकेने सांगितले. या बदल्यात पाच दिवसांसाठी हल्ले थांबविण्याची इस्राईलची तयारी आहे. मात्र, अद्याप कराराबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR