विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर भागात पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चिन्नागल्लूर छावणीपासून सुमारे ३५० मीटर अंतरावर आयईडी स्फोट झाला. यामध्ये सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना प्राथमिक उपचारानंतर योग्य उपचारासाठी विजापूर जिल्हा मुख्यालयात आणण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सीआरपीएफच्या १५३ व्या बटालियनचे ए. सी. साकेत, इन्स्पेक्टर संजय, डी. एच. पवन कल्याण, जी. डी. लोचन मेहता आणि जी. डी. दुले राजेंद्र अशी जखमी जवानांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयईडी शोधून नष्ट करण्याच्या मोहिमेदरम्यान सीआरपीएफच्या जवानांचे एक पथक शोध मोहिमेवर होते. दरम्यान, तार्रेम आणि गुंडम दरम्यान सुरक्षा कर्मचा-यांनी स्फोटकाशी जोडलेली एक तार पाहिली. ते तारेला जोडलेल्या बॉम्बचा शोध घेत असताना त्याचा स्फोट झाला, ज्यात ५ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, असे अधिका-यांनी सांगितले.