36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवइंडिया आघाडीचे सरकार आल्यास खते, बियाणासह इतर औजारावरील जीएसटी मोफत करणार

इंडिया आघाडीचे सरकार आल्यास खते, बियाणासह इतर औजारावरील जीएसटी मोफत करणार

धाराशिव : प्रतिनिधी
देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर शेतक-यांसाठी खते, बियाणे यासह शेतक-यांना लागणारे इतर औजारे साहित्य यावरील जीएसटी मोफत करतो, असे आश्वासन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. धाराशिव येथील मल्टीपर्पज हायस्कूल येथील आयोजित सभेत शनिवारी (दि.४) ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, माजी खासदार शिवाजी कांबळे, माजी आमदार दिनकर माने, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अशोक जगदाळे, प्रतापसिंह पाटील, शंकरराव बोरकर, मकरंद राजेनिंबाळकर, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, मसुद शेख, रणजित पाटील, शामल वडणे आदी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, मी मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेवून दिल्लीच्या हुकूमशहा विरोधात उभा आहे. तुम्हाला हा महाराष्ट्र माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही. असे सांगून महायुतीचे उमेदवार ओमराजे यांना मी ७ मे नंतर प्रचारासाठी इतर ठिकाणी पळवणार आहे.

ओमदादा, कैलासदादाच्या कामावर मी याठिकाणी मते मागायला आलोय, जुगाड लावायला नाही. भाजपा आता ४०० चा जुगाड लावला आहे. ही निवडणूक खरोखर तुम्ही म्हणजे जनतेने हातात घेतली आहे. याठिकाणी अमित शहाचे गुप्तहेर फिरत असतील, मोदींनी काल एक मुलाखत दिली. त्यामध्ये मोदींनी माझ्याबद्दल आस्था व प्रेम व्यक्त केले. परंतू मी आजारी असताना हे तुमच्या माणसाला माहिती नव्हते का? माझे विचित्र ऑपरेशन झाले असताना तुमचे पाव उपमुख्यमंत्री व आमचे गद्दार माझे सरकार खाली खेचण्यासाठी एकत्र आले होते. त्यामुळे मोदीजी सांगतात उध्दव ठाकरेवर संकट आले तर धावून येईन, मी ही आज तुम्हाला सांगतो तुमच्यावर संकट आले तर तुमच्यासाठी हा उध्दव ठाकरे कधीही धावून येण्यास तयार आहे.

आज तुम्ही सांगतात उध्दवजींनी बाळासाहेबांचे विचार व हिंदुत्व सोडले. परंत २०१४ साली खडसेंचा मला युती तोडण्याचा फोन आला होता. त्यावेळी हे तुम्हाला माहित नव्हते का? उध्दव ठाकरे कोण आहे. बाळासाहेबांना केवळ बाळासाहेब म्हणू नका तर हिंदू-हदयसम्राट असे म्हणा, बाळासाहेबांच्या खोलीतच शपथ घेवून अमित शहांनी सांगितले होते. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दिले जाईल, परंतू त्यांनी तो शब्द मोडला. आज ते खोटे बोलत आहेत. मी मुख्यमंत्री असताना दहा रुपयात शिवभोजन, कर्जमुक्ती दिली. एकही उद्योग बाहेर जावू दिला नव्हता, उद्योग आणत होतो. मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल ठाकरे म्हणाले की, तुमचे उत्पन्न दुप्पट झाले का? तुम्हाला घरे मिळाली का? महागाई कमी झाली का? असे असाल विचारुन मी जे बोलले ते करुन दाखवले. परंतू मोदी जे बोलतात ते सर्व काहीच केले नाही. २०१४ साली जे बोलले ते मोदींना आठवणत नाही. कारण हे गजनी सरकार आहे. आज तुम्हाला ओमराजे शुल्लक वाटतात. मग आता तुम्ही सर्वसामान्याकडे मते का मागता. त्यामुळे आता माझी सटकली. मोदी आणि अमित शहा आज इतक्या जवळ लोक येवू देतात का? आज माझ्या कीती जवळ तुम्ही आहात, मोदीजी तुम्ही धाराशिवला निघालात तर तुम्ही माझ्या तुळजापूरला दर्शनाला जा. परंतू ते गेले का? तुळजाभवानीबद्दल तुम्ही बोललात का? निवडणूक आयोग आज जय भवानी, जय शिवाजी याबद्दल आक्षेप घेत आहेत. परंतू आम्ही जय भवानी जय शिवाजी बोलणारच. हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. तुम्हाला जय भवानी जय शिवाजीचे नाव घेण्याचा विरोध म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आकस आहेत.

आज शिवसेनाप्रमुख नाहीत, असे समजू नका आज माझ्यासमोर सर्व शिवसेनाप्रमुखच बसले आहेत. जेव्हा महराष्ट्रावर संकट येते तेंव्हा आम्ही एकत्रित येत संकटावर मात करतो. मग ते आठरा पगड जातीतील लोक असतात. मोदीजींना चारशे पार कशासाठी करायचे आहे तर संविधान बदलायचे आहे. साध्या दलित कुटूंबात जन्मलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान त्यांना बदलयाचे आहे. पण ते आम्ही होवू देणार नाही. आमचे हिंदुत्व हे त्यांच्यासारखे गोमुत्रधारी व बुरसटलेले नाही. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलायचा प्रयत्न केलात तर देश पेटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्वांना एकदा मुर्ख बनवाल पण आता समाज जागा झाला आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगे प्रत्येकवेळी करायचे, आता त्यांनी नवीन काढला आहे. इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल, आम्ही तुमच्यासारखे गपचुप जावून नवाज शरिफ यांचा केक खावून आलो नाहीत की जीनाच्या कबरीवर डोके ठेवून आलो नाहीत. आज आमच्याकडे मोठ्या संख्येने मुस्लिम आहेत. आमचे हिंदूत्व चुल पेटवणारे आहे. तुमच्यासारखे घर पेटवणारे नाही. आज उत्पन्न दुप्पट नाही झाले, मात्र भाजपाच्या खात्यात दहा हजार कोटी आलेत. हे कोठून आले. कॉंग्रेसच्या खात्यात किती आले तर तेही खाते गोठून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी धनगर समाजाच्या वतीने काठी आणि धोंगडे देवून ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. पंकज काटे यांच्याकडून संविधान भेट देण्यात आले. या सभेसाठी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे आभार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी आभार मानले.

पाच वर्षे सेवा केली, यापुढेही करण्याची संधी द्या : ओमराजे
तुमच्या घरातील सदस्य तुमचा हक्काचा खासदार म्हणून काम केले आहे. खासदरकीची शपथ घेतल्यापासून पाच वर्षे काम करत आलो आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते त्यावेळी मला अडीच वर्षे काम करता आले. कित्येक वर्षापासूनचे स्वप्न असलेले वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला आणले. मी पाच वर्षे इमाने इतबारे काम केले आहे. मात्र विरोधकाकडून मला संपर्कावरुन हिनवल जातय, महावितरणची १६०० कोटीपर्यंतची कामे केली. कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसाठी २२०० कोटी मिळवून दिले. २०१४ ते २०१९ मध्ये फडणवीस सरकार असताना सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेसाठी गतीने काम केले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत २०३ रस्ते केले. दिव्यांग बांधवांना ४ कोटी ६१ लाखाचे साहित्य मिळवून दिले. तामिलनाडू प्रमाणे महाराष्ट्रातील मराठा आरक्षण द्यावे, लिंगायत समाज अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी, धनगर, मुस्लिम समाज आरक्षण यासाठीची विधानसभेत आपण बाजू मांडली. मराठा आरक्षणाबाबत काळ दिवस म्हणून सांगणारा आज पत्नी उमेदवार असल्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेला. उमेदवारी यांच्यात घरात, या उमेदवाराकडे साडेतीनकिलो सोने कुठून आले, असा सवालही ओमराजे यांनी विरोधी पाटील कुटूंबावर केला. पाच वर्षे सेवा केली त्यामुळे यापुढेही सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.

नवरा एका तर बायको दुस-या पक्षात अशी वाईट स्थिती : दानवे
आपल्याला ओमराजे यांना दुस-यांदा खासदार म्हणून पाठवायचे आहे. मोदी सरकार शेतकरी हिताचे नाही, कांदा, कापसाला, सोयाबीनचे भाव पडले आहेत. आपले सरकार असताना सोयाबीनला ११ हजार भाव होता. आज २६ हजार ६८ शेतकरी आत्महत्या आहेत. आज नवरा एका पक्षात तर बायको या पक्षात अशी विरोधकांची झाली आहे. धाराशिव येथेही नवरा एका पक्षात तर बायको दुस-या पक्षात आहे, अशी अवस्था आहे. ही पक्षाशी, विचाराशी गद्दारी आहे. हर घर, हर घर जल अशी घोषणा केली होती. परंतू ते आजपर्यंत मिळाले नाही. परंतू या घोषणा फसव्या ठरल्या. त्यामुळे हे फसवे सरकार आहे. येणारे सरकार आपले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR