37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

मुंबईत पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता मुंबई पोलिसांनी ३ व ४ मे रोजी ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मुंबई शहर व परिसरातील गुन्हेगारीवर कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील ८ फरारी आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच ५३ अजामीनपात्र वॉरंट बजावून आरोपींवर कारवाई करण्यात आली.

देशात आचारसंहिता असल्याने सर्वत्र पोलिसांचा अलर्ट मोड असून महाराष्ट्रातही निवडणुका सुरू असल्याने पोलिस कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणूक काळात होत असलेल्या चुकीच्या कृत्यांवर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतील आरोपींवर कारवाई करण्यात आली असून अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणा-या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा अन्वये एकूण ५ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच अवैध शस्त्र बाळगणा-या एकूण ४९ कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध अग्निशस्त्र हत्यारे, बंदूक जप्तीच्या एकूण २ कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या विशेष कारवाईंतर्गत २ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली असून २ आरोपींस अटक करण्यात आली.

अवैध दारू विक्री, जुगार इ. अवैध धंद्यांवर २४ ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यादरम्यान ३० आरोपींस अटक करण्यात आली. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने एकूण ६२ कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १२०, १२२, १३५,१४२ अन्वये संशयितरित्या वावरणा-या इसमांवर एकूण १७५ कारवाया करण्यात आल्या.

यासोबतच अनधिकृत फेरिवाल्यांवर एकूण १५४ कारवाया करण्यात आल्या तर बृहन्मुंबई शहरात एकूण २०६ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील ९६४ आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये २३० आरोपी मिळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. येथील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १११ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.

७२३३ वाहनांची झाडाझडती
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई केली. यामध्ये एकूण ७२३३ दुचाकी-चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये २२४० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. कलम १८५ मोवाका अन्वये ७७ वाहन चालकांवर कारवाई केली. यासोबतच ८०० हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणीही करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR