30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरमाढ्यात फडणवीसांनी मांडला महायुतीसाठी सारीपाट

माढ्यात फडणवीसांनी मांडला महायुतीसाठी सारीपाट

सोलापूर : रणजित जोशी
माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यापासून त्यांची मोठी हवा असल्याने रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी राजकीय सारीपाटावर सोंगट्या फिरवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकरांना बळ दिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात राहावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी झंझावाती दौरा केला. यावेळी त्यांनी बेरजेचे राजकारण करत अनेकांना भाजपकडे खेचले आणी माढा मतदारसंघात सारीपाटावर सोंगट्या फिरवत महायुतीच्या उमेदवारांची स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला.

२०१९ला भाजपने प्रथम माढा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेतला. मात्र तेव्हा पक्षासोबत असणारे उत्तम जानकर यांनी यंदा वेगळा रस्ता धरला आहे. मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे तिकिट घेतले तर जानकर यांनी त्यांची साथ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फडणवीस हे जास्त सक्रिय झाले असून अगोदरच त्यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील विरोधकांना एकत्र करत रणजितसिंह निंबाळकरांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माढा मतदारसंघात तीन तालुक्यांचा दौरा करून राजकीय रणनीती भक्कम केली.

माढा विधानसभा क्षेत्रात आमदार बबनराव शिंदे यांची ताकद असून ते महायुतीचे आमदार आहेत. तसेच शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी त्यांचा संघर्ष असतो. मात्र, सध्या त्यांच्यातील वाद शमवून दोस्ताना करण्यासाठी फडणवीस यांनी वाकावचा दौरा केला. येथे आमदार शिंदे यांच्यासह येण्याचे सावंत यांनी जाहीर केले. येथे आमदार बबनराव शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू अपक्ष आमदार संजय शिंदे उपस्थित होते.

करमाळा व माढ्यात आमदार शिंदे बंधू यांचे वर्चस्व आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांच्यावर जास्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. मोहिते-पाटील, उत्तम जानकर तसेच नारायण पाटील हे सध्या भाजपसोबत नाहीत त्यामुळे करमाळा भागात अन्य नेत्यांना आपल्या बाजूला वळवून जास्तीत जास्त मते घेण्याचा प्रयत्न फडणवीस यांचा आहे. फडणवीस यांनी सांगोल्यात सभा घेत पहिल्यापासून खासदार निंबाळकर यांची साथ करणारे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील तसेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाने जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्याशी चर्चा केली. पाटील व साळुंखे हे दोन्ही नेते भाजपचा प्रचार मोठ्या ताकदीने करत आहेत. फडणवीस यांच्या दौ-यात सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये राजकीय वजन असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांना बोलावण्यात आले होते. तसेच क्लस्टरप्रमुख प्रशांत परिचारक फडणवीस यांच्या दौ-यात होते.

अकलूजमध्ये सभा घेत फडणवीस यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर टीका करत महायुतीच्या कार्यकर्त्यांना उत्साहित केले. येथील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जनसेवा संघटनेचे प्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यात निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला. फडणवीस यांनी येथे बेरजेचे राजकारण केले. एक मोहिते-पाटील भाजपपासून दूर होताच दुस-या मोहिते-पाटलांना फडणवीस यांनी आपल्या गटात ओढले. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनाही आपल्याकडे वळविण्यात फडणवीस यांना यश आले आहे. विठ्ठल कारखान्याला मदत करण्याच्या बदल्यात अभिजीत पाटलांनी भाजप उमेदवारांचा प्रचार सोलापूर व माढा मतदारसंघात करण्याचे ठरले आहे.

याबरोबरच राजेंद्र गिरमे यांनाही फडणवीस यांनी महायुतीसाठी सक्रिय केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील आणि निंबाळकर यांच्यात कडवा संघर्ष होत आहे. त्यात निंबाळकर यांची बाजू भक्कम व्हावी म्हणून फडणवीस यांनी मतदारसंघातले मोजके मोहरे आपल्या बाजूला वळवून सक्रिय केले आहेत. मोहिते-पाटील यांना अस्मान दाखवून भाजपचे वर्चस्व कायम रहावे म्हणून फडणवीस यांनी जोरदार रणनीती आखत माढा लोकसभेच्या सारीपाटावर चाली रचल्या आहेत. मात्र राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. हा खेळ कसा खेळायचा हे केवळ राजकीय नेते ठरवत नाहीत, मतदारही ठरवत असतो. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR