नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्यासोबत निश्चित झाला आहे. या भव्य विवाह सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू असून, सुप्रिया सुळे यांनी आपली मुलगी रेवती आणि होणारे जावई सारंग यांच्यासह नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना विवाह सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भावी दांपत्याला भेटून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. या कौटुंबिक भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा रंगली आहे.
विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे आपल्या कन्या आणि जावयासोबत सध्या दिल्लीत असून त्यांनी विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींशिवाय त्यांनी संसदेतील आणि देशातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी अत्यंत सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध असल्याने दिल्लीत देशपातळीवरील दिग्गजांची मांदियाळी या लग्नकार्यानिमित्त पाहायला मिळणार आहे.
सोयरिकीची राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा
विशेष म्हणजे, रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे हे लग्न ठरण्यामागे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची एक वेगळीच बाजू समोर आली आहे. नागपूरच्या लखानी कुटुंबाशी ही सोयरिक जुळवून आणण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. यामुळेच या कौटुंबिक सोहळ्याला राजकीयदृष्ट्याही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘या’ दिवशी रंगणार विवाह सोहळा
प्राप्त माहितीनुसार, रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा मुख्य विवाह सोहळा येत्या २० जून २०२६ रोजी मुंबईत मोजक्या आणि व्हीआयपी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. लखानी कुटुंबीय हे नागपूरचे असल्याने आणि विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या मोठ्या उद्योग समूहाचे मालक असल्याने, लग्नानंतर एक मोठा आणि दिमाखदार रिसेप्शन सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. तसेच, पवार कुटुंबाच्या देशपातळीवरील स्नेहामुळे दिल्लीतही राष्ट्रीय नेत्यांसाठी एका खास रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी देवीच्या चरणी लग्नाची पहिली पत्रिका ठेवून बाप्पाचा आशीर्वाद घेतला होता, आणि आता दिल्लीत निमंत्रण पत्रिका वाटपाचा सिलसिला सुरू झाला आहे.
















