पुणे: नीट-यूजी २०२६ (NEET-UG 2026) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यात एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेली पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार हिच्या सदाशिव पेठेतील राहत्या घराची झडती घेतली असता, सीबीआयच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. हवालदारच्या घरातून भौतिकशास्त्र (Physics) विषयाच्या प्रश्नांचे तब्बल २३ पानांचे हस्तलिखित, नीटच्या विविध मूळ प्रश्नपत्रिका, राष्ट्रीय परीक्षा संस्थेची (NTA) अधिकृत प्रमाणपत्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, मनीषा हवालदार हिने स्वतः प्रश्न हस्तलिखित स्वरूपात तयार करून ते व्हॉट्सअॅप आणि प्रिंटआउटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
घरात काय काय सापडले?
सीबीआयच्या तपास पथकाने सदाशिव पेठेतील मनीषा हवालदारच्या घराची कसून झडती घेतली. या झडतीदरम्यान खालील गोष्टी जप्त करण्यात आल्या त्यात भौतिकशास्त्र विषयाच्या २३ पानांच्या हस्तलिखित नोट्स. नीट-यूजीच्या विविध मूळ प्रश्नपत्रिका (यामध्ये प्रामुख्याने मराठी-इंग्रजी मास्टर सेट एम-२ कोडची प्रश्नपत्रिका आणि हिंदी-इंग्रजी स्वरूपातील प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे). एनटीएकडून (NTA) देण्यात आलेली उपस्थिती प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांच्या प्रती.
कपाटातून १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोख रक्कम सापडली, ज्यापैकी ६० हजार रुपये सीबीआयने जप्त केले आहेत.
स्मरणशक्तीच्या आधारे भाषांतर आणि ‘एनटीए’ कनेक्शन
तपासादरम्यान मनीषा हवालदार हिने गुन्ह्याची कबुली देताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने एप्रिल २०२६ मध्ये नीट-यूजीच्या भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न केवळ स्मरणशक्तीच्या आधारे भाषांतरित करून तेजस शाह नावाच्या विद्यार्थ्याला दिले होते. हे प्रश्न तिने एनटीएच्या रसायनशास्त्र तज्ज्ञ (Chemistry Expert) डॉ. सुजाता काळे यांच्या सांगण्यावरून दिल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मुख्य संस्थेपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.
शाळा आणि पतीच्या मोबाईलचा वापर
त्यानंतर सहआरोपी मनीषा मांढरे हिच्या विनंतीवरून हवालदारने हेच प्रश्न व्हॉट्सअॅपवर पाठवले. यासाठी तिने स्वतःचा आणि तिच्या पतीचा मोबाईल वापरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ‘शेठ हिरालाल सराफ प्रशाले’तील अधिकृत संगणकाचा वापर करून या प्रश्नांच्या प्रतिमा (Images) प्रिंट करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
कारवाईच्या भीतीने मनीषा हवालदार हिने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. तिने मनीषा मांढरेसोबतचे व्हॉट्सअॅप चॅट डिलीट केले होते आणि भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हस्तलिखित मूळ नोट्स जाळून टाकल्या होत्या, अशी कबुली तिने सीबीआयकडे दिली आहे.
मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये; जाळे आणखी पसरण्याची शक्यता
तपास पथकाला मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये अत्यंत संशयास्पद व्हॉट्सअॅप चॅट आढळले आहेत. त्यामुळे हा मोबाईल पुढील फॉरेन्सिक विश्लेषणासाठी (Forensic Analysis) पाठविण्यात आला आहे. सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे नीट-यूजी २०२६ प्रश्नपत्रिका फुटीचे जाळे अत्यंत व्यापक असल्याचे स्पष्ट होत असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी काही बड्या व्यक्तींवर कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
















