29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्र‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बसविषयी माहिती जाणून घेतली. या बसला शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी त्याच धर्तीवर स्किल सेंटर ऑन व्हील संकल्पना हा नावीन्यपूर्ण चांगला उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतील. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, नोकरी मागणारे नाहीतर नोकरी देणारे हात निर्माण झाले पाहिजेत.

अशा योजनेतून नोकरी देणारे हात तयार होतील ही चांगली बाब आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध रोजगार मेळावे आयोजित करून या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून गावागावांत जाऊन स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले जाणार असून या माध्यमातून जॉब ओरिएंटल प्रशिक्षण मिळणार आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीमार्फत नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्किल सेंटर ऑन व्हील संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील युवकांना करिअर मार्गदर्शन देणे, त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास उपक्रमाबाबत माहिती देणे, त्याचे प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि समाजिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळेल. या कार्यक्रमांतर्गत ब्युटी अँड मेकअप ट्रेड, इलेक्ट्रिकल डॉमेस्टिक अप्लायन्सेस व कम्प्युटर एज्युकेशन या व्यवसायांच्या कार्यशाळा बसमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.
बसच्या चालन, परिवहन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाबरोबर ५ वर्षांचा करार करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR