26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रइंडिया आघाडी म्हणजे ‘भानुमतीचा कुणबा’, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले

इंडिया आघाडी म्हणजे ‘भानुमतीचा कुणबा’, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले

मुंबई (प्रतिनिधी) : विरोधकांच्या इंडिया आघाडीची शिवाजी पार्कवरील सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होते. ज्यांना जनतेने तडिपार केलेय असे लोक एकत्र येऊन भाजपाला तडिपार करण्याच्या वल्गना करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि हिंदूंचा अवमान करणा-या स्टॅलिन सोबत मैत्री करून स्व. बाळासाहेबांची विचारधारा सोडलीच होती. कालच्या सभेत त्यांनी हिंदू बांधवांनो म्हणण्याचेही टाळले. हिंदू धर्माचा अपमान करणा-यांना जनताच त्यांची जागा दाखवेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्क मैदानातील सभेवर टीका केली आहे. देशभरातील निराश झालेले लोक राहुल गांधींच्या सभेत होते. विरोधकांची आघाडी म्हणजे ‘कही की ईट, कही का रोडा, भानुमतीने कुणबा जोडा’, असा प्रकार आहे. कोणाचा कोणाला पायपोस नाही फक्त मोदी द्वेष त्यांच्या भाषणातून दिसत होता. ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी दीड पावणे दोन वर्षांपूर्वी तडिपार केलं तेच लोक आता अब की बार तडिपारचा नारा देत आहेत. स्वा. सावरकर आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर ही सभा झाली हा काळा दिवस आहे.

हिंदुत्व विचारधारेविरुद्ध बोलणा-यांसोबत ठाकरे बसले. ज्यांनी वीर सावरकरांचा, हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा अपमान केला अशा लोकांसह उद्धव ठाकरे बसले होते. उद्धव ठाकरेंनी त्याबद्दलही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली. ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ हा शब्दही त्यांच्या भाषणातून काल गायब झाला. त्यांनी बाळासाहेबांचे धोरण, विचार सोडल्यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांना भाषणासाठी केवळ ५ मिनिटांचा वेळ दिला गेला. त्यावरून त्यांची पत कळाली, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

मोदींची १० वर्षांची कामगिरी लोकांसमोर आहे. महायुतीने केलेले कामही आपल्यासमोर आहे. शेतकरी, कामगार, महिला, उद्योग या सर्वात महाराष्ट्राने आघाडी घेतली. मेट्रो, अटल सेतू अशी अनेक कामे झाली तर अनेक प्रगतिपथावर आहेत. राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR