26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीय‘इंडिया’ ठरतोय ‘एनडीए’ला लयभारी!

‘इंडिया’ ठरतोय ‘एनडीए’ला लयभारी!

प्रचारातील चार मुद्यांनी फोडला भाजपला घाम भाजपचा ४०० पारचा नारा विस्मृतीत?

नवी दिल्ली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व भाजप नेते प्रचारात गुंतले आहेत. दुसरीकडे भाजपाविरोधी इंडिया आघाडी आता आक्रमक होताना दिसत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान बनण्याची संधी मोदींकडे आहे. भाजपने अबकी बार ४०० पार यासाठी मेहनत घेतली आहे.

परंतु पहिल्या २ टप्प्यातील मतदानानंतर भाजप जास्त आशावादी दिसत नाही. भाजपाने या निवडणुकीत ४३२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अजूनही १० जागांवर निर्णय बाकी आहे. भाजपाला ३७० जागांचे बहुमत हवे असेल तर एकूण उमेदवारांपैकी ८६ टक्के उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. परंतु सध्या भाजपचे हे टार्गेट कठीण होत असल्याचे दिसून येत आहे.

आरक्षण संपवणारे सरकार
सरकार आरक्षण संपवणार आहे असा प्रचार आणि प्रसार करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला आहे. त्यात गृहमंत्री अमित शाह यांचा फेक व्हीडीओही व्हायरल झाला. मोदी सरकार आल्यास आरक्षण संपवणार असा प्रचार विरोधकांनी केला आहे. त्यामुळे हा मुद्दा भाजपासाठी डोकेदुखी बनला आहे. विरोधी पक्षांच्या या टीकेवर भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यात कर्नाटकात मुस्लीम समाजाचा ओबीसीत समावेश करून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. धर्माच्या आधारे काँग्रेसला देशात आरक्षण द्यायचे आहे असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

संविधान वाचवा, लोकशाही वाचवा
मागील १५ दिवसांपासून देशात संविधान वाचवण्यासाठी दोन्ही बाजूकडून हल्लाबोल सुरू आहे. भाजपाला ४०० पार बहुमत देशातील संविधान बदलासाठी हवे आहे. जर ते पु्न्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील असा प्रसार विरोधकांकडून केला जात आहे. ज्यारितीने ईडी-सीबीआयच्या माध्यमातून सरकार मनमानी करत आहे. विरोधी पक्षांवर दबाव तंत्र वापरून नेत्यांना जेलमध्ये टाकत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्यासारख्या नेत्यांना जेलमध्ये टाकल्याने विरोधकांनी लोकशाही वाचवा असे आवाहन देशातील जनतेला केले आहे.

जेडीएस नेत्याचे सेक्स स्कँडल
२ दिवसांपूर्वीच देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना यांचे अनेक आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झालेत. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. शेकडो महिलांसोबत रेवन्ना यांचा हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. प्रज्ज्वल रेवन्ना हा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. इंडिया आघाडीने या मुद्यावरून भाजपाला कोंडीत पकडले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनीही मोदींना लक्ष्य केले आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कँडल बाहेर काढले, त्याला मत द्या, माझे हात बळकट होतील असे आवाहन मोदी करतायेत. ही तुमची संस्कृती, अटलजींचा आत्मा रडत असेल. सेक्स स्कँडल करणा-यांची घराणेशाही तुम्हाला चालते असे ठाकरेंनी म्हटले.

अबकी बार ४०० पार
भाजपाचा अबकी बार ४०० पार चा नारा आता उलटा पडला आहे. भाजपा कार्यकर्त्यांसाठी हा नारा उत्साहकारक असला तरी भाजपाच विजयी होणार यामुळे अनेक भाजपा मतदार मतदान केंद्रापर्यंतही पोहचत नसल्याचे दिसते. भाजपाच्या विजयासाठी एक मत न दिल्याने काय फरक पडेल, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित आहे अशा प्रकारे हावभाव असल्याने अनेक कार्यकर्ते निश्चित आणि भाजपा मतदार आत्मविश्वासात रंगला आहे. त्यामुळे अबकी बार ४०० पारचा नारा भाजपच्या अंगलट येतो का असे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR