ग्लासगो : येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन सुरूच ठेवले असून भारताचा स्टार धावपटू गुलवीर सिंग याने पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. तर दुसरीकडे, भारोत्तोलनमध्ये हरजिंदर कौर हिनेही भारताच्या खात्यात आणखी एका रौप्यपदकाची भर घातली आहे.
आशियाई विजेता असलेल्या गुलवीर सिंगने स्कॉटस्टौन स्टेडियमवर २७ मिनिटे ४९.७८ सेकंदांची वेळ नोंदवत ऐतिहासिक रौप्यपदकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या काय रोबिन्सनने या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. महिलांच्या ६९ किलो वजनगटात २९ वर्षीय भारोत्तोलक हरजिंदर कौरने एकंदरीत २२७ किलो वजन उचलत रौप्यपदकाला गवसणी घातली. ग्लासगोमधील वेटलिफ्टिंगमधील आठ स्पर्धांपैकी भारताचे हे सातवे पदक ठरले आहे. यापूर्वी २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत हरजिंदरने कांस्यपदक जिंकले होते. गुलवीर आणि हरजिंदरच्या यशामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. यामध्ये २ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
















