तेहरान : मध्य पूर्वेतील तणावादरम्यान इराणजवळ एका भारतीय नाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून एमटी सेलेस्टियल या ऑइल टँकरवर असलेल्या निशांत उर्थनाथन या भारतीय क्रू मेंबरची प्रकृती अचानक खालावली होती. मात्र वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील तणाव आणि भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी निशांत यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. जहाजावर मृतदेह ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कोल्डस्टोरेज नसल्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी अत्यंत हृदयद्रावक पाऊल उचलले. निशांत यांचा मृतदेह सडू नये म्हणून सहका-यांनी तो प्लास्टिकमध्ये गुंडाळला आणि त्यावर पाण्याच्या थंड बाटल्या ठेवल्या. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला होता ज्यामध्ये एक सहकारी कर्मचारी आजारी निशांत यांना जेवण भरवण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.
अमेरिकन मरीनने घेतली होती जहाजाची झडती
ज्या एमटी सेलेस्टियल या व्यावसायिक जहाजावर निशांत यांचा मृत्यू झाला, ते जहाज गेल्या महिन्यापासून वादात सापडले होते. मे २०२६ मध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये अमेरिकेची नाकेबंदी तोडल्याच्या संशयावरून अमेरिकन मरीनने हे जहाज रोखले होते. त्यानंतर अमेरिकन सैन्याने संपूर्ण जहाजाची कसून झडती घेतली होती. २० मे रोजी युएस सेंट्रल कमांडने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, झडती पूर्ण झाल्यानंतर या जहाजाला सोडण्यात आले होते, पण त्यांना त्यांचा मार्ग बदलायला सांगितला होता. या नाकेबंदी आणि आंतरराष्ट्रीय वादामुळेच जहाजाला वेळेत बंदरावर पोहोचता आले नाही आणि निशांत यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
ओमानमधील भारतीय दूतावास सतर्क
या गंभीर घटनेची दखल घेत ओमानमधील भारतीय दूतावास अॅक्शन मोडमध्ये आला आहे. दूतावासाने निशांत यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय दूतावास निशांत उर्थनाथन यांच्या प्रकरणात ओमानचे स्थानिक अधिकारी, बंदर प्रशासन आणि संबंधित शिपिंग कंपनीसोबत संपर्कात आहे. एमटी सेलेस्टियल जहाजावर वैद्यकीय कारणांमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे जहाज लवकरच ओमानच्या डुक्म बंदरावर नांगर टाकेल अशी अपेक्षा आहे. जहाजावरून मृतदेह लवकरात लवकर बाहेर काढून तो भारतात आणण्यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे असे भारतीय दूतावासाने सांगितले.
















