नवी दिल्ली : ब्रिटनच्या पाकिस्तानमधील उच्चायुक्त जेन मॅरियट यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमध्ये (पीओके) जाऊन तेथे भेटीगाठी करण्यास भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. इस्लामाबादेतील ब्रिटिश उच्चायुक्तांचा हा दौरा अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याबाबत शनिवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही अधिकृत निवेदन जारी केले.
संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग होते, आहेत आणि राहतील, असे स्पष्ट करतानाच भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे मॅरियट यांच्यासारख्या उच्चपस्थांकडून झालेले उल्लंघन भारताला पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र सचिवांनी या प्रकरणी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांकडे तीव्र निषेध अधिकृतरीत्या नोंदवला आहे. इस्लामाबादेतील ब्रिटिश उच्चायुक्त जेन मॅरियट यांनी गुरुवारी (१० जानेवारी) त्यांच्या अलीकडच्या मीरपूर भेटीची अनेक छायाचित्रे ‘एक्स’वर टाकली होती. त्यात म्हटले होते की ब्रिटन आणि पाकिस्तानच्या लोकांमधील संबंधांचे ‘हृदय’ असलेल्या मीरपूरकडून शुभेच्छा! ७० टक्के ब्रिटिश पाकिस्तानी मूळचे मीरपूरचे आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी परस्परहितासाठी एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे. मॅरियट यांनी यापूर्वी ८ जानेवारीलाही एका पोस्टमध्ये म्हटले होते, की सध्या त्या कराची, लाहोर आणि इस्लामाबादमधील सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांना भेटत आहेत. मूलभूत आर्थिक सुधारणा सुरू ठेवणे आवश्यक आहे. येत्या ८ फेब्रुवारीला होणा-या सार्वत्रिक निवडणुका पाकिस्तानच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या आहेत.