जेरूसलेम : हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या ४९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे गाझा पट्टीमध्ये १४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझामधील युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीद्वारे चालवल्या जाणा-या अबू हुसेन स्कूलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास १०० जण जखमी झाले आहेत.
गाझा पट्टीतील एका डॉक्टरने दावा केला आहे की, इस्रायली सैन्याने उत्तर गाझा येथील जबलिया कॅम्पला लक्ष्य केले आहे. हे गाझामधील सर्वांत मोठ्या निर्वासित कॅम्पपैकी एक आहे. या कॅम्पच्या आत अबू हुसेन शाळा होती, जिथे इस्रायली सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
अल-जजीराच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी जबलिया कॅम्पमधून पळून गेले आहेत. यावेळी इस्रायली लष्कराने कॅम्पमध्ये असलेल्या शाळेला लक्ष्य केले आहे. याशिवाय उत्तर गाझा येथील इंडोनेशियाई रुग्णालयावरही इस्रायलीने हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी सांगितले की, ‘रुग्णालयावर बॉम्बफेक करण्यात आली असून शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे.’
गाझाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिसमध्येही हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्यात पाचहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये ७ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. यामध्ये १४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे गाझामध्ये अनेक संकटं निर्माण झाली आहेत. तेथील परिस्थिती गंभीर आहे.