तेलअवीव : वृत्तसंस्था
इस्त्रायल आणि इराण युद्ध चांगलेच पेटले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर वार-पलटवार करण्यात येत आहेत. शनिवारी रात्रीही दोन्ही देशांनी तुफान हल्ले केले. इस्त्रायलने इराणच्या संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य केले. तसेच इराणमधील अनेक मोठे ऑईल डेपो, गॅस रिफायनरीवर, आण्विक प्रकल्पावर तुफान क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य कराल तर आमचं सैन्य हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला. दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे.
इस्रायलचा मुख्य उद्देश इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेली अणू चर्चा धुडकावून लावणे हा आहे. रविवारी सहाव्या फेरीच्या चर्चेत एक प्रस्ताव मांडला जाणार होता, जो आता रद्द करण्यात आला आहे. अमेरिकेचे नाव न घेता इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, इस्रायलने केलेला हल्ला पाठिंब्याशिवाय होणारा नाही. जर अमेरिकेला विश्वास हवा असेल तर त्यांनी हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे.
दरम्यान, रविवारी सकाळी अनेक ठिकाणी सायरन वाजले. येरुशलेम आणि तेल अवीवसारख्या मोठ्या शहरात सायरनचे सतत आवाज ऐकू येत आहेत. इराण सातत्याने तेल अवीवला लक्ष्य करत आहे. इस्त्रायल इराणचे सर्व अण्वस्त्र केंद्र नष्ट करण्याच्या तयारीत आहे.
इस्त्रायलने इराणच्या फज्र गॅस रिफायनरी केंद्रावर हल्ला केला. हे केंद्र जगातील सर्वात मोठे नैसर्गिक गॅस भांडार आहे. या रिफायनरीमधून १२५ मिलियन क्यूबिक मीटर गॅसवर प्रक्रिया होते. मागील ४८ तासांत इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात १३० जणांचा मृत्यू झाला. त्यात नऊ अणू शास्त्रज्ञ आहेत. जखमींची संख्या ३०० पेक्षा जास्त आहे. इस्त्रायलने तेहरानमध्ये केलेल्या हल्ल्यात एका गगनचुंबी इमारतीमधील २९ मुलांसह ६० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवरील हल्ले वाढवण्याचे वक्तव्य केले. इस्त्रायलच्या हल्ल्यास उत्तर देत इराणकडून हल्ले केले जात आहेत.
इराणी हल्ल्यांनी ‘हैफा’ आगीने वेढले!
रविवारी सकाळी इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलमधील हैफा शहर हादरले. हैफा शहर हे तेल रिफायनरीचे केंद्र आहे. इराणच्या हल्ल्यानंतर हैफामधून आगीचे लोट दिसून येत आहेत. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हैफा रिफायनरीला मोठी आग लागली. इस्रायली चॅनल १२ ने देखील हैफा जवळील एका मोक्याच्या ठिकाणी मोठी आग लागल्याची पुष्टी केली आहे. हैफा शहर इस्रायलसाठी खूप महत्वाचे आहे. या शहरावर हल्ला झाल्यास इस्रायल आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतो. इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमधील आठ मजली इमारतीवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच इराणकडून तेल अवीवमधील इतर काही भागांवरही हल्ले करण्यात आले आहेत.
इस्रायलचे ‘बुशहर’ शहराला जीवदान
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इस्रायलने इराणचा अणुबालेकिल्ला नतान्झ उद्ध्वस्त केला, पण केवळ प्रतिहल्ला न करता या हल्ल्यामुळे अणुदुर्घटना घडू शकली असती, ते शहर मुद्दाम सोडले. या शहराचे नाव बुशहर आहे, जिथे इराणचा एकमेव कार्यरत अणुप्रकल्प आहे. बुशहर रिऍक्टरमधून केवळ वीजच तयार होत नाही, तर अग्नीसज्ज प्लुटोनियमही तयार होतो. पण ही लाईव्ह रिऍक्टर असल्याने त्यावर हल्ला करणे म्हणजे संपूर्ण परिसर रेडिएशन झोनमध्ये बदलणे होय. विशेषत: बुशहर युएईच्या सीमेपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असल्याने त्रुटींना वाव नव्हता. आयएईएने निवेदनात स्पष्ट केले आहे की, सध्या रेडिएशनचा कोणताही धोका नाही आणि बुशहर अणुभट्टी देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. पण पुढच्या वेळी अणुभट्टी लक्ष्य ठरली तर ते केवळ इराण-इस्रायल युद्ध ठरणार नाही, तर त्याचे रूपांतर जागतिक अणुसंकटात होऊ शकते, अशी भीती कायम आहे.