तेहरान : वृत्तसंस्था
मध्यपूर्वेतील युद्धाने आता अत्यंत भीषण आणि निर्णायक वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या पोलाद कारखान्यांसह अणू प्रकल्पांवर धडाधड क्षेपणास्त्रे डागत इराणला मोठा दणका दिला आहे. या हल्ल्यांनंतर इराण कमालीचा संतापला असून, या कृत्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिला आहे.
केवळ अणू प्रकल्पच नव्हे, तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलाद कारखान्यांवरही इस्रायलकडून बॉम्बवर्षाव करण्यात आला आहे. इस्फहानमधील ‘मोबारेकेह स्टील प्लांट’वर झालेल्या हल्ल्यात एका कर्मचा-याचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
इस्रायली लष्कराने या हल्ल्यांची पुष्टी केली असून, या मोहिमेला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत इराणच्या ‘अराक हेवी वॉटर प्लांट’ आणि ‘यजद’ येथील युरेनियम प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या मते, हे प्रकल्प अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत होते, त्यामुळे त्यांना नष्ट करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते.
कारखान्यांमध्ये हाहाकार; जीवित हानीची भीती
खुजेस्तानमधील एका कंपनीत १६ कर्मचारी जखमी झाले असून फिरोजाबादची खाण आणि मशहद विमानतळाच्या गोदामांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमुळे इराणमध्ये भीतीचे सावट पसरले असून ठिकठिकाणी आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत.
ट्रम्प यांच्यावर इराणची आगपाखड
इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. एकीकडे कूटनीतिक चर्चेसाठी वेळ वाढवून द्यायचा आणि दुसरीकडे शांततेच्या प्रयत्नांना हरताळ फासत भीषण हल्ले करायचे, हे निंदनीय आहे, असे अराघची यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांमुळे आता शांतता चर्चेची शक्यता मावळली असून संपूर्ण आखाती प्रदेश महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे.

