तेल अवीव : इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचा परिणाम लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच भोगावा लागत आहे. शनिवारी सकाळी इस्रायलने गाझा शहराच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर मोठा हल्ला केला. ज्यामध्ये १०० हून अधिक पॅलेस्टिनींना आपले प्राण गमवावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझा शहरातील दराज भागात अल-ताबिन नावाची शाळा आहे, जिथे विस्थापित लोकांनी आश्रय घेतला होता. या ठिकाणी लोक जेव्हा नमाज अदा करत होते, तेव्हा तीन रॉकेट डागण्यात आले, ज्यामुळे १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.हमास संचालित गाझा सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आहे. सरकारने सांगितले की, इस्रायलने जागोजागी आश्रय घेतलेल्या नागरिकांना लक्ष्य केले, परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या घटनेकडे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
ही शाळा दहशतवाद्यांचा अड्डा होता- इस्रायली लष्कर
दरम्यान, या हवाई हल्ल्याचा इस्रायली लष्कराने बचाव केला असून, हल्ल्यात अल-तबायिन शाळेच्या आत असलेल्या हमास कमांड आणि कंट्रोल सेंटरला लक्ष्य करण्यात आले होते. हे केंद्र हमासचे दहशतवादी आणि कमांडर लपण्याचे ठिकाण म्हणून वापरले जात होते, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.