मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार यांनी विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे. याशिवाय व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालावी, अशी मागणी देखील जय पवार यांनी केली आहे.
विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणा-या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे असे जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटले आहे.
अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच अजित पवार यांच्या अपघातावर जाहीर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जय पवार यांच्याकडून इन्स्टाग्राम पोस्ट करत पारदर्शक सत्य जाणून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. व्हीएसआरला तत्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालण्याची तसेच विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल चौकशीची मागणी जय पवार यांनी केली आहे. जय पवार यांनी देखील व्हीएसआरच्या चौकशीची मागणी करत रोहित पवार यांच्या प्रमाणे भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते.
राष्ट्रवादीकडून सीबीआय चौकशीची मागणी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.
व्हीएसआरचे कोणाशी संबंध?
रोहित पवार यांनी आतापर्यंत अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात तिसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हीएसआरवर अनेक आरोप केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात डीजीसीएने दिलेल्या स्पष्टीकरणावर देखील रोहित पवार यांनी आक्षेप घेतला. याशिवाय व्हीएसआर विमान कंपनी आणि तेलुगु देसम पार्टीच्या नेत्यांचे संबंध असल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना पदावरुन हटवण्यात यावे, अशी देखील मागणी रोहित पवार यांनी केली होती. अजित पवार यांना जे विमान देण्यात आलेले होते, त्या विमानाचे इंजिन देखील बिघाड असलेले होते, असा दावा देखील रोहित पवार यांनी केला होता.

